निवडणुकीच्या कामात सक्रिय सहभाग देणाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून गौरव:जि.प, मनपा, पोलिसांसह सामाजिक संस्थांना मिळवून दिली ओळख‎

अमरावती विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी प्रशासकीय यंत्रणेसोबतच विविध सामाजिक संघटना तसेच सेवाभावी आणि स्वयंसेवी संस्थांनी झोकून काम केले. त्या कामाला ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने गुरुवारी सायंकाळी विविध खात्याचे अधिकारी-कर्मचारी तसेच संस्था-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या अध्यक्षतेखाली जि. प. च्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, जिल्हा परिषदेच्या सीईओ संजीता महापात्र, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रीती देशमुख, सहायक जिल्हाधिकारी अमर राऊत, जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार यांची प्रमुख उपस्थिती होती. निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी ही नेहमीच चिंताजनक असते. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही जिल्ह्यात मतदानाचा टक्का घसरलेलाच होता. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचे काम या सर्व यंत्रणांनी केले. त्यासाठी स्वीप कक्ष स्थापन केला होता. जि. प. सीईओ महापात्र यांच्या नेतृत्वातील या कक्षाने अमरावती शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही विविध उपक्रम राबवले. त्यामध्ये निबंधलेखन, पथनाट्य, गीत-गायन, शाहिरी, फ्लेक्स, वोटोबा, सेल्फी पॉइंट, मतदानाची शपथ, मानवी साखळी, पायदळ वारी, सायकल दौड, बाइक रॅली आदींचा समावेश होता. यासाठी स्थानिक संस्था, संघटनांचीही मदत घेण्यात आली. अशाप्रकारे मदत करणाऱ्या तब्बल ३७ संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना या वेळी प्रशस्तिपत्रे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वीप कक्षाचे अधिकारी ज्ञानेश्वर घाटे यांनी केले. प्रास्ताविक सीईओ संजीता महापात्र यांनी केले. आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस यांनी मानले. कार्यक्रमासाठी संजय राठी, नितीन माहोरे, हेमंत यावले, राजेश सावरकर आदी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. ईश्वरी गांजरे या चिमुकलीचाही केला सत्कार निवडणूक काळात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये चित्रकला, रांगोळी अशा विषयांचाही समावेश होता. ईश्वरी गांजरे या चिमुकलीने चित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासह जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त आदी अधिकाऱ्यांची रेखाटनेही तयार केली. विशेष म्हणजे ही रेखाटने या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना ससन्मान देण्यात आली. मतदान वाढवण्यासाठी सहाय्यभूत ठरलेल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमाणपत्र स्वीकारताना ईश्वरी गांजरे ही चिमुकली.

  

Share