‘लाडकी बहीण’ची काळजी तुम्ही करू नये:हसन मुश्रीफांचा सुप्रिया सुळेंना टोला, जाहिरातीवरूनही मागितली जाहीर माफी

राज्यात नवीन सरकार स्थापन झाले असून विरोधकांनी आतापासून सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. लाडक्या बहिणींना 3 हजार रुपये देण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. तसेच डिसेंबरपासूनच किंवा 1 जानेवारी 2025 पासून खात्यात महिना 2100 रुपये जमा करा असेही त्या म्हणाल्या. त्यांच्या विधानावर हसन मुश्रीफ यांनी टोला लगावला आहे. नियमात असलेल्या सर्व लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळेल, त्यामुळे सुप्रिया सुळेंनी काळजी करू नये, असे ते म्हणाले. हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य करत भाजपच्या शपथविधीच्या जाहिरातीवरून देखील जाहीरपणे माफी मागितली. टाटा, बिर्लाच्या मुलींना कसा लाभ मिळणार?
सुप्रिया सुळे यांनी लाडक्या बहिणीची काळजी करू नये. आम्ही 1500 रुपयांचे 2100 रुपये लवकरच करणार आहोत. नियमात असलेल्या सर्व लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळेल. पण टाटा, बिर्लाच्या मुलींना कसा याचा फायदा होईल? असा सवाल करत मुश्रीफ यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. तसेच आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणीकडून वसुली करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दादांच्या आदेशाचे पालक करू
राज्यात 11 किंवा 12 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी शक्यता असल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले. तसेच मंत्रिपदावरून कोणत्याही पक्षाकडून रस्सीखेच किंवा मतभेद नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटणीला जी मंत्रीपद येतील त्याचा सर्वस्वी निर्णय अजितदादा घेतील त्यांच्या आदेशाचे पालन आम्ही सर्वजण करू, असेही त्यांनी सांगितले. तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी किती मंत्री पदे मिळतील याची काही माहिती नसल्याचे ते म्हणाले. शपथविधीच्या जाहिरातीवरुन जाहीरपणे माफी
भाजपच्या वतीने शपथविधी सोहळ्यासाठी दिलेल्या जाहिरातीमध्ये राजर्षी शाहू महाराजांचा फोटो छापला नव्हता. यावरून विरोधकांनी महायुतीला धारेवर धरले होते. या जाहिरातीवरूनही हसन मुश्रीफ यांनी जाहीर माफी मागितली. शपथविधी सोहळ्यासाठी वर्तमानपत्रात देण्यात आलेल्या महायुतीच्या जाहिरातीमध्ये अनावधानाने राजर्षी शाहू महाराजांचा फोटो राहून गेला असेल, तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण राजर्षी शाहू महाराजांना बाजूला सारणे हे आमच्या मनात देखील नाही. संपूर्ण शासनाच्या वतीने मी याबाबत दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत हसन मुश्रीफ यांनी जाहीरपणे माफी मागितली. …अन् आता ईव्हीएम बाद झाले का?
विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले, तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडले. यावरून हसन मुश्रीफ यांनी मविआच्या नेत्यांचा समाचार घेतला. लोकसभेच्या वेळी ईव्हीएम चांगले होते. आता आमच्या जागा आल्या, त्यावेळी ईव्हीएम बाद झाले का? अनेकवेळा निवडणूक आयोगाने आणि सर्वोच्च न्यायालयाने याबाबत खुलासा केला आहे. ईव्हीएम हॅक होते, असे आतापर्यंत कोणीही सिद्ध केले नाही. लाडकी बहीण, शेतकरी आणि महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम या निवडणुकीमध्ये झाला, असे ते म्हणाले.

  

Share