खेलंदाजी थांबली!:लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन; मुंबईत घेतला अखेरचा श्वास, उद्या होणार अंत्यसंस्कार

खुमासदार लिखाण आणि क्रिकेट समालोचनाने मराठी रसिकांना वेड लावणारे लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन आज निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. संझगिरी यांनी मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. संझगिरी मुंबई महापालिकेत उच्च पदावर कार्यरत होते. पण क्रिकेट आणि मराठी साहित्यातल्या रुचीने त्यांच्यातला क्रिकेट समीक्षक घडवला. मराठी क्रिकेटरसिकांनी त्यांच्या लिखाणाला नेहमीच पसंतीची दाद दिली. संझगिरी यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी 12 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील. महापालिकेत अभियंता द्वारकानाथ संझगिरी यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1950 रोजी मुंबई झाला. त्यांनी किंग जॉर्ज स्कूल (आताचे राजा शिवाजी विद्यालय) आणि रामनारायण रुईया महाविद्यालयात शिक्षण घेतले. पुढे इंजिनिअरिंग केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून नोकरी केली आणिी 2008मध्ये पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता म्हणू निवृत्त झाले. स्तंभलेखन, क्रिकेट समीक्षण, समालोचन अशा सर्व क्षेत्रात त्यांनी मुशाफिरी केली. एकच षटकार संझगिरी यांनी 1970 मध्ये लेखन सुरू केले. ‘दिनांक’ आणि ‘श्री’ सारख्या मासिकांमध्ये त्यांच्या लिखानाचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. भारताने इंग्लंडमध्ये 1983 चा विश्वचषक जिंकला. त्यानंतर त्यांनी इतर काही मित्रांसह ‘एकच षटकार’ हे पाक्षिक क्रीडा मासिक सुरू केले. या मासिकासाठी संझगिरी यांनी कार्यकारी संपादक म्हणून काम केले. स्तंभलेखन सुरू केले संझगिरींनी 1980 च्या दशकात स्तंभलेखन सुरू केले. ‘आज दिनांक’, ‘सांझ लोकसत्ता’, ‘मिड-डे’, ‘तरुण भारत’, ‘पुढारी’ आणि इतर दैनिके, नियककालिकांमधून त्यांचे लेख प्रसिद्ध होऊ लागले. लोकसत्तामधील त्यांचे क्रीडा लेख आणि प्रवासवर्णनसंबंधीत स्तंभ प्रचंड गाजले. संझगिरी यांनी 25 वर्षांहून अधिक काळ ‘सामना’ या मराठी वृत्तपत्रासाठी अनेक क्रिकेट स्पर्धांचे वार्तांकन केले. उत्तम संकल्पना राबवल्या संझगिरी यांनी अनेक उत्तम संकल्पना राबवल्या. त्यात तडीस नेल्या. सुनील गावसकर आणि गुंडप्पा विश्वनाथ यांचा त्यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार, सचिन तेंडुलकरांच्या विक्रमी 35 व्या कसोटी शतकानिमीत्त त्यांचा सत्कार, 1971 च्या इंग्लिश मालिका विजेत्या भारतीय संघाचा सत्कार आणि सचिन तेंडुलकरांचा सर्वात अलीकडचा त्यांची पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सत्कार या कार्यक्रमाची संकल्पना त्यांची होती. त्यांनी ते पारही पाडले. नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धापासून त्यांनी एकपात्री स्टँडअप टॉक शो केले. त्यांनी हजाराहून अधिक कार्यक्रम केले. विपुल लेखन केले ‘बोलंदाजी’ या स्पोर्ट्स दूरचित्रवाणी कार्यक्रमसाठी ते प्रस्तुतकर्ता होते आणि ‘मधु इथे अन् चंद्र तिथे’ या अजून एका दूरचित्रवाणी कार्यक्रमाचे पटकथा लेखक होते. वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवरही त्यांचे शो झाले. संझगिरी यांनी 2004 पासून ‘ती रा की ट धा’ आणि ‘स्वरा आर्ट्स’ या संस्थांनी सादर केलेल्या संगीतमय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हे कार्यक्रमही खूप गाजले. सोबतच संझगिरी यांनी चित्रपट, प्रवास, क्रीडा अशा विविध विषयांवर तब्बल 40 पुस्तके लिहिली आहेत. हर्षा भोगले यांची श्रद्धांजली सु्प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी एक्सवर एक पोस्ट करून द्वारकानाथ संझगिरी यांना श्रद्धांजली वाहिली. हर्षा भोगले आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दुःख झाले. आमची ३८ वर्षांची मैत्री होती. ते कायम आठवणीत राहतील. त्यांचे लेखन अतिशय शैलीदार होते. माझ्या मित्राच्या कुटुंबाप्रती माझ्या सहवेदना. क्रिकेटचा अफाट व्यासंग बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आशिष शेलार यांनी द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाबद्दल दुखः व्यक्त केले. ते म्हणाले की, संझगिरी यांच्या निधनाची बातमी ऐकूण अतिशय दु:ख वाटले. ते क्रिकेटप्रेमी, क्रिकेटवर संशोधन करणारे, क्रिकेटचे खोल ज्ञान असणारे लोकप्रिय समालोचक होते. त्यांचा क्रिकेट व्यासंग अफाट होता. क्रिकेटची ते इनसायक्लोपीडिया होते. त्यांचे समालोचन कायम स्मरणात राहील. क्रीडाविश्वाचा ज्ञानकोष हरपला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संझगिरी यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झालं. कोट्यवधी क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा क्रीडाविश्वाचा चालताबोलता ज्ञानकोष हरपला आहे. प्रदीर्घ काळ क्रीडा पत्रकारिता केलेल्या द्वारकानाथ संझगिरी यांच्याकडे क्रिकेटसह क्रीडा विश्वातील रंजक गोष्टींचा खजिना होता. रंजक गोष्टी खुमासदार शैलीत लिहिण्याची, सांगण्याची कला त्यांना अवगत होती. या कलागुणांच्या जोरावर त्यांनी कोट्यवधी क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांचं निधन ही महाराष्ट्राला चटका लावणारी घटना आहे. मी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार द्वारकानाथ संझगिरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातलं त्यांचं स्थान अढळ आणि अविस्मरणीय आहे. संझगिरी यांनी पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन क्रिकेट, क्रीडाक्षेत्राची खेळाची सेवा केली. खेळांचा आत्मा समजून घेत खेळ आणि खेळाडूंना जोडण्याचं काम केलं. क्रीडा क्षेत्रातील घटना, त्या घटनेचं विश्लेषण खुमासदार लेखनशैली, जीवंत समालोचनाद्वारे रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. क्रिकेटसह सर्वच क्रीडा प्रकारांबद्दल त्यांना सखोल ज्ञान होतं. खेळांमधले बारकावे समजावून सांगण्याची त्यांची शैली अद्वितीय होती. त्यांच्याकडे बघत क्रीडा पत्रकार, क्रीडा रसिकांच्या अनेक पिढ्या मोठ्या झाल्या. त्यांच्या निधनानं मराठी क्रीडा पत्रकारितेतील दीपस्तंभ ढासळला आहे. क्रीडा पत्रकारिता आणि क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात त्यांचं नाव अजरामर राहणार आहे. पोकळी दीर्घकाळ जाणवेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्वारकानाथ संझगिरी यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, क्रीडा समीक्षणात साहित्यविश्वाचे सौंदर्य ओतून आपल्या ओघवत्या कथनशैलीमुळे क्रीडाक्षेत्राची आवड मनामनांत पेरणारे प्रसिद्ध समीक्षक, साक्षेपी साहित्यिक, पत्रकार, स्तंभलेखक आणि चित्रवाणी कार्यक्रमांचे निर्माते अशा विविध क्षेत्रांत आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविणारे द्वारकानाथ संझगिरी यांच्या दुःखद निधनामुळे मराठीच्या सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने एका मिश्किल आणि खुमासदार शैलीच्या क्रीडा पत्रकाराला महाराष्ट्र मुकला आहे. उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखनशैली, उत्कृष्ट समीक्षा, अशा अनेक गुणांनी संपन्न असलेल्या संझगिरी यांनी मराठी, इंग्रजी आदी भाषांतील लेखनातून वाचकांशी साधलेल्या संवादाचा धागा तुटला आहे. त्यांच्या असंख्य पुस्तकांनी मराठी वाचकांना आनंद दिला आणि अनुभवविश्व समृद्ध केले. अशी व्यक्तिमत्वे ही समाजाची श्रीमंती असते. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी दीर्घकाळ जाणवत राहील. या लोकप्रिय व्यक्तिमत्वास सद्गति प्राप्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. क्रीडाक्षेत्राची मोठी हानी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे, ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, लेखक आणि सूत्रसंचालक द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.मराठी भाषेत क्रिकेट लेखनाच्या माध्यमातून त्यांनी क्रिकेटप्रेमींना वेगळ्या शैलीत हा खेळ समजावून सांगितला. हलक्याफुलक्या शैलीतील लेखन आणि समालोचन या माध्यमातून ते लोकप्रिय क्रीडा समीक्षक बनले. त्यांचं निधनाने क्रीडाक्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. स्व. द्वारकानाथ संझगिरी यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच प्रार्थना! संझगिरी यांनी लिहिलेली पुस्तके क्रीडा – शतकात एकच – सचिन – चिरंजीव सचिन – दिलखुलास बातचीत क्रिकेटपटूंशी – खेलंदाजी – बोलंदाजी – चॅम्पियन्स – चित्तवेधक विश्वचषक २००३ – क्रिकेट कॉकटेल – क्रिकेट वर्ल्ड कप हायलाईट्स – कथा विश्वचषकाच्या – लंडन ऑलिम्पिक – पॉवर प्ले – स्टंप व्हिजन – संवाद लिजंड्सशी – स्टंप व्हिजन/क्रिकेट गाथा – थर्ड अंपायर – इंग्लिश ब्रेकफास्ट प्रवासवर्णन – फिश अँड चिप्स – मुलूखगिरी – फिरता – फिरता – पूर्व अपूर्व – फाळणीच्या देशात – भटकेगिरी – ब्लू लगून – माझी बाहेरख्याली – जीन अँड टॉनिक चित्रपट आणि मनोरंजन – फिल्मगिरी – तिरकटधा – ब्लॅक अँड व्हाईट – वो भुली दास्तान – आम्हांला वगळा – देव आनंद – लतादीदी – प्यार का राग सुनो – आशा भोसले, एक सुरेल झंझावात व्यक्तीचित्रण – अफलातून अवलिये / दशावतार – वल्ली आणि वल्ली विनोद – खुल्लमखिल्ली – स. न. वि. वि. /खुला खलिता सामाजिक – तानापिहिनिपाजा – दादर – एक पिनाकोलाडा – रिव्हर्स स्वीप – वेदनेचे गाणे

  

Share