मागेल त्याला सौर कृषी पंप:शंभर दिवसांचे उद्दीष्ट 60 दिवसात पूर्ण, 52 हजार 705 पंप बसवले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने निश्चित केलेल्या शंभर दिवसांच्या उद्दीष्टांपैकी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजने’त 52,705 सौर पंप बसविण्याचे उद्दीष्ट महावितरणने 60 दिवसात पूर्ण केले, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. 5 डिसेंबर 2024 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर शंभर दिवसात म्हणजे दि. 16 मार्च 2025 पर्यंत विविध विभागांसाठी उद्दीष्टे निश्चित करण्यात आली आहेत. महावितरणने या कालावधीत मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत एकूण दीड लाख पंप बसविण्याचा टप्पा गाठण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले होते. दि. 6 डिसेंबर रोजी 97,295 सौर कृषी पंप बसविण्यात आले होते. त्यानंतर दि. 4 फेब्रुवारीपर्यंत महावितरणने 53,009 सौर कृषी पंप बसविले. त्यामुळे ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेत आतापर्यंत बसविलेल्या पंपांची संख्या 1,50,304 झाली आहे. महावितरणला शंभर दिवसात 52,705 पंप बसवायचे उद्दीष्ट होते पण साठ दिवसात 53,009 सौर पंप बसविण्यात आले. राज्यात 4 फेब्रुवारी अखेर बसविलेल्या 1,50,304 सौर कृषी पंपांमध्ये जालना (18,494 पंप), बीड (17,944), अहिल्यानगर (13,366), परभणी (11,755), संभाजीनगर (9,329), नाशिक (9,143), हिंगोली (8,538), धाराशीव (6765) आणि जळगाव (6648) या जिल्ह्यांनी आघाडी घेतली आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप या राज्य सरकारच्या योजनेत केंद्र सरकारकडून 30 टक्के आणि राज्य सरकारकडून 60 टक्के अनुदान मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ 10 टक्के रक्कम भरून सौर ऊर्जा निर्मिती करण्याचे सौर पॅनेल्स, कृषी पंप असा संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा 5 टक्के असून त्यांना 95 टक्के अनुदान मिळते. सौर कृषी पंप बसविल्यावर शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध होत असल्याने त्यांची अनेक दशकांची मागणी पूर्ण होते. हे पंप वीजजाळ्यावर अवलंबून नसल्याने शेतकरी दिवसा हव्या त्या वेळेला सिंचन करू शकतो. सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्समधून 25 वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ कृषी पंपासाठी वीजबिलातून मुक्तता होते. सौर ऊर्जेचा वापर केल्यामुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते. सौर कृषी पंप बसविण्याच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याने देशात आघाडी घेतली आहे. गेल्या वर्षभरात या मोहिमेला विशेष गती आली आहे. राज्यात 2015 पासून नऊ वर्षात महावितरणने 1,06,616 सौर कृषी पंप विविध योजनांच्या अंतर्गत बसविले होते. तथापि, जानेवारी 2024 ते फेब्रुवारी 2025 पर्यंत दीड लाख पंप बसविले आहेत.