महायुती सरकारमध्ये 41 कोटी 59 लाखांचा भ्रष्टाचार:नाना पटोले यांचा आरोप, धनंजय मुंडेसह श्रीकृष्ण पवारांचे घेतले नाव
महाराष्ट्र राज्य यंत्रमाग मंडळाच्या माध्यमातून कापूस साठवणूक बॅग खरेदीसाठी निविदा वेगळ्या शिर्षिका खाली काढून 77 कोटी रुपयांची खिरापत वाटून 41.59 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे महाव्यवस्थापकीय संचालक तथा उप सचिव वस्त्रोद्योग श्रीकृष्ण पवार आणि तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी संगनमत करुन 577 रुपयांची पिशवी 1 हजार 250 रुपयांना खरेदी करुन 41 कोटी 59 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे नाना पटोले म्हणाले. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करुन श्रीकृष्ण पवार आणि धनंजय मुंडेंवर कारवाई करा अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या नावाखाली विविध महामंडळाच्या माध्यमातून खरेदी आणि पुरवठ्यांच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून लूट केली आहे. काँग्रेस पक्ष महामंडळाच्या माध्यमातून सुरु असलेल्या या भ्रष्टाचाराविरोधात विधिमंडळात आवाज उठवणार असून सरकारने कारवाई केली नाही तर रस्त्यावरची लढाई लढून या भ्रष्टाचा-यांवर कारवाई करायला सरकारला भाग पाडू, असेही नाना पटोले म्हणाले. कापूस साठवणूक पिशव्या खरेदीतही भ्रष्टाचार
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप युती सरकारने भ्रष्टाचाराचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. कापूस साठवणूक पिशव्या खरेदीतही भ्रष्टाचार करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार करण्यात आला असून 77.25 कोटी रुपये यासाठी देण्यात आले आहेत. एकाच परिवारातील 4 वेगवेगळ्या कंपन्याना बेकायदेशीररित्या निविदा काढून हे काम देण्यात आले आहे. यंत्रमाग महामंडळाचे महाव्यवस्थापकीय संचालक तथा उप सचिव वस्त्रोद्योग श्रीकृष्ण पवार यांनी त्यांच्या मर्जीतील एका पुरवठादाराला माहिती देऊन त्यांच्या संगनमताने सर्व प्रक्रिया राबवून गैरव्यवहार करण्यात आला आहे. ही खरेदी प्रक्रिया लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना निवडणूक आयोगाची परवानगी न घेताच करण्यात आली. या कामासाठी चार कंपन्यांची निवड करण्यात आली होती. त्यातील तीन कंपन्या ओसवाल या एकाच परिवारातील आहेत, तर चौथी कंपनी ओसवाल यांच्या सनदी लेखापालाची आहे, असे पटोले म्हणाले होते. 41 कोटी 59 लाख 35 हजार 536 रुपयांचा भ्रष्टाचार
यंत्रमाग महामंडळाने कापूस साठवणूक पिशव्या खरेदीसाठी प्रति पिशवी 1250 रुपयांचा दर मंजूर करण्यात आला. आयसीएआर नागपूर यांना याच पिशव्या 577 रुपये या दराप्रमाणे पुरवठा करण्यात आल्या आहे. म्हणजे प्रति पिशवी 673 रुपये जास्त दराने खरेदी करून एकूण 41 कोटी 59 लाख 35 हजार 536 रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाने आयुक्तालयाकडून कापूस साठवणूक बॅग उत्पादनासाठी कच्चा माल खरेदी करण्यासाठी निधी अग्रीम स्वरुपात 77.25 कोटी रुपये महामंडळास अदा करुन घेतला. महामंडळ कापूस साठवणूक पिशवी उत्पादकाकडून विकत घेऊन पुरवठा करणार होते. यात कच्चा मालाच्या खरेदीचा प्रश्नच येत नसताना कच्चा माल पुरवठा करण्यासाठी या शिर्षकाखाली हा व्यवहार करण्यात आला असेही नाना पटोले म्हणाले. घोटाळ्यात सर्वच सहभागी, म्हणून मुंडेंवर कारवाई नाही?
एकनाथ शिंदे सरकारच्या काळात धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी साहित्य खरेदी आणि पुरवठ्याच्या डीबीटी योजनेत नियमबाह्य बदल करून मोठा गैरव्यवहार झाल्याचे नाना पटोले म्हणाले. या संदर्भात काँग्रेस पक्षाने सातत्याने सभागृहात व रस्त्यावर उतरून आवाज उठवला होता पण सरकारने काहीच कारवाई केली नाही, असा आरोपीही त्यांनी केला. तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही सर्व खरेदी तत्कालीन अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या परवानगीने आणि मान्यतेने झाली आहे, असे पत्रकार परिषदेत सांगितले आहे. त्यामुळे या घोटाळ्यात हे सर्वच सहभागी आहेत. त्यामुळेच ते धनंजय मुंडेंवर कारवाई करत नाहीत का? असा सवाल नाना पटोले यांनी केला.