संजय राऊतांनी आधी चर्चा करायला हवी होती:स्वबळाच्या घोषणेवर वर्षा गायकवाडांची टीका, म्हणाल्या – आमच्या पक्षाची भूमिकाही लवकरच सांगू

संजय राऊतांनी आधी चर्चा करायला हवी होती:स्वबळाच्या घोषणेवर वर्षा गायकवाडांची टीका, म्हणाल्या – आमच्या पक्षाची भूमिकाही लवकरच सांगू

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली. त्यांच्या घोषनेनंतर एकच खळबळ उडाली असून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. आम्हीही मुंबईपासून ते नागपूरपर्यंत महापालिका निवडणुका कशा लढवायच्या यावर वरिष्ठांशी बोलून ठरवू, असे सूचक वक्तव्य काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केले. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. महायुती या निवडणुकांच्या तयारीला लागली असून, महाविकास आघाडीत बिघाडी होत असल्याचे दिसत आहे. ठाकरे गट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार, अशी घोषणा संजय राऊत यांनी आज केली. महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिल्यानंतर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी उपरोक्त विधान केले आहे. काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?
महाविकास आघाडी एकत्र राहिली पाहिजे अशीच आमची इच्छा आणि भूमिका असून त्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या. ठाकरे गटाच्या महापालिका निवडणुकीच्या भूमिकेसंदर्भात आम्ही वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करणार असून त्यानंतर निर्णय घेऊ, असेही त्या म्हणाल्या. राऊत यांनी अशा गोष्टी थेट माध्यमांमध्ये जाऊन बोलण्यापेक्षा चर्चेच्या माध्यामातून सांगायला पाहिजे होती, अशा शब्दांत वर्षा गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर आगपखाड केली. संजय राऊत त्यांच्या पक्षाचे व्यक्तिगत मत मांडत असतील. पण आमच्या पक्षाची भूमिका लवकरच सांगू, असेही गायकवाड यांनी सांगितले आहे. … तरीही आम्ही आघाडी धर्म प्रामाणिकपणे पाळला
आम्हाला निवडणुकीत संधी मिळायला पाहिजे, असे आमच्या कार्यकर्त्यांचेही म्हणणे असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. विधानसभेला मुंबईमध्ये काही ठिकाणी आमच्या जागा निवडून येऊ शकल्या असत्या, असा दावाही त्यांनी केला. महाविकास आघाडीचा लोकसभा एकत्र लढवण्याचा निर्णय झाला, तेव्हा मी लोकसभेचे तिकीट वेगळीकडे मागितले होते. मात्र, मला वेगळ्या ठिकाणी तिकीट देण्यात आले. आम्हाला विधानसभेत म्हणाव्या तशा जागा मिळाल्या नाहीत. तरीही आम्ही आघाडी धर्म प्रामाणिकपणे पाळला. आता महापालिकेच्या निवडणुकीत मुंबईपासून नागपूरपर्यंत काय निर्णय घ्यायचा? ते पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून आम्ही ठरवू, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. हे ही वाचा… ठाकरे गटाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचे सूचक विधान:म्हणाल्या – सर्व निवडणुका आपल्या सोयीने लढलो तर कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का? विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी कायम राहणार का? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया देत सूचक विधान केले आहे. सर्व निवडणुका आपल्या सोईने लढलो तर कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का? असे मत सुप्रिया सुळे यांनी मांडले आहे. सविस्तर वाचा…

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment