सारंगवाडीत गावकऱ्यांनीच निवडलेल्या सरपंचावर गावकऱ्यांनी दाखविला अविश्वास:ठरावाच्या बाजूने 422 तर विरोधात 51 मते, मराठवाड्यातील दुसराच ठराव
औंढा नागनाथ तालुक्यातील सारंगवाडी येथे गावकऱ्यांतून निवड झालेल्या सरपंचाला गावकऱ्यांनीच ग्रामसभेतून मतदानाद्वारे पाय उतार केले आहे. शुक्रवारी ता. ३१ झालेल्या मतदानात ४२२ गावकऱ्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने तर ५१ जणांनी विरोधात मतदान केले. तर २६ मतदान बाद झाले आहे. ग्रामसभेतून अविश्वासाची हि मराठवाड्यातील दुसरीच वेळ आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील सारंगवाडी येथील ग्रामपंचायतीची निवडणुक सुमारे अडीच वर्षापुर्वी झाली आहे. या ग्रामपंचायतीमध्ये ९ सदस्य असून सरपंचांची निवड गावकऱ्यांतून झाले होती. त्यानंतर मागील काही दिवसांपासुन सदस्यांना सरपंच प्रभुलिंग महाराज यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता. ९ विरुध्द एका मताने अविश्वास ठराव पारित झाला होता. मात्र सरपंच प्रभुलिंग महाराज यांची निवड गावकऱ्यांतून झाल्यामुळे ग्रामसभा घेऊनच त्यातून अविश्वास ठरावाबाबत निर्णय घेण्यात यावा अशा सुचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आज पिठासन अधिकारी तथा सहाय्यक गटविकास अधिकारी बालाजी गोरे, विस्तार अधिकारी सय्द जमीर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी सकाळी ९ ते साडे आकरा यावेळेत गावकऱ्यांची नांव नोंदणी करून घेण्यात आली होती. त्यानंतर दुपारी बारा ते चार यावेळेत मतदान झाले. यामध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदानासाठी वर्तूळ हे चिन्ह देम्यात आले तर अविश्वास ठरावच्या विरोधात मतदानासाठी त्रिकोण हे चिन्ह देण्यात आले होते. त्यानुसार ४९९ गावकऱ्यांनी मतदान केले. दुपारी चार वाजल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी करण्यात आली. यामध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने ४२२ तर अविश्वास ठरावाच्या विरोधात ५१ मते मिळाली तर २६ मते बाद झाली. त्यानंतर पिठासन अधिकाऱ्यांनी अविश्वास ठराव पारित झाल्याचे जाहिर केले. दरम्यान, गावकऱ्यांनी निवडलेल्या सरपंचाला गावकऱ्यांनीच मतदानाद्वारे पाय उतार केल्याची हि मराठवाड्यातील दुसरी घटना असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रक्रियेसाठी ग्रामसेवक जी. पी. हलबुर्गे, महमद कलीम, एस. एम. आम्ले, राजकुमार बर्गे यांनी काम पाहिले.