निपुण हिंगोली उपक्रमात उत्कृष्ठ काम करणाऱ्यांचा सत्कार:मात्र दुर्लक्ष करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचा इशारा
निपुण हिंगोली उपक्रमात उत्कृष्ठ काम करणाच्या शिक्षकांचा जिल्हास्तरावर सत्कार केला जाईल मात्र गुणवत्तावाढीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी गुरुवारी ता. ९ वसमत येथील शिक्षण परिषदेत दिला आहे. वसमत येथे आयोजित शिक्षण परिषदेत जिल्हाधिकारी गोयल यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भोसले, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, प्रशांत डिग्रसकर, गटविकास अधिकारी यु. डी. तोटावाड, गटशिक्षणाधिकारी सतीष काष्टे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की, निपुण हिंगोली या उपक्रमांतर्गत जिल्हयातील सर्वच शाळांची गुणवत्ता वाढेल याबाबत आपण आशावादी आहोत. आम्ही केवळ मार्गदर्शन करू शकतो मात्र प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम शिक्षकांनाच करावे लागणार आहे. त्यासाठी या उपक्रमात सर्वच शिक्षकांनी सहभागी होऊन गुणवत्ता वाढीसाठी तसेच अध्यापनासाठी नवीन तंत्रज्ञान, नवनवीन साधनांचा वापर करावा. सर्वच शिक्षक चांगले आहेत. एकमेकांचे मार्गदर्शन घेऊन गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी प्रशासनाचे अधिकारी वेळोवेळी शाळांना भेटी देऊन पाहणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील शाळांमधून गुणवत्तावाढीच्या बाबतीत माझा विद्यार्थी अंतिमस्तरापर्यंत का नाही हे लक्षात घेऊन शिक्षकांनी काम करावे. जिल्ह्यातील गुणवत्तावाढीच्या बाबतीत आम्ही आशावादी आहोत. सर्वच शिक्षक या उपक्रमात चांगले काम करतील असा विश्वास आहे. उत्कृष्ठ काम करणाऱ्या शिक्षकांचा जिल्हास्तरावरून सत्कार केला जाईल. मात्र गुणवत्तावाढीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.