मेकॅनाइज्ड इन्फंट्रीने दाखवले संयुक्त राष्ट्र शांततेसह विविध मोहिमांत शौर्य:सैन्यप्रमुख जनरल द्विवेदी यांचे प्रतिपादन; चार तुकड्यांना प्रतिष्ठीत ध्वज प्रदान
मेकॅनाइज्ड इन्फंट्रीने ऑपरेशन पवन, ऑपरेशन विजय, ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन स्नो लेपर्ड आणि संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमांसह अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये असाधारण शौर्य करून दाखवले आहे. असे प्रतिपादन सैन्यप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केले. सैन्यप्रमुख (सीओएस) जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मेकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटर आणि स्कूल येथे झालेल्या समारंभात मेकॅनाइज्ड इन्फंट्रीच्या चार तुकड्यांना राष्ट्रपतींचा प्रतिष्ठित ध्वज प्रदान केला. बुधवारी हा कार्यक्रम झाला. देशसेवेसाठी केलेल्या उल्लेखनीय व आदर्श योगदानाचा सन्मान होता. राष्ट्रपतींचा ध्वज २६ व २७ मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटच्या तुकड्यांना तसेच २० व २२ ब्रिगेड ऑफ द गार्ड्सच्या तुकड्यांना प्रदान करण्यात आला, ज्यामुळे सैन्याच्या या तरुण तुकड्यांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला. या भव्य समारंभास अनेक माजी सैनिक, लष्करी अधिकारी आणि नागरी मान्यवर उपस्थित होते, ज्यामुळे या सन्मानाचे महत्त्व अधोरेखित झाले. सैन्यप्रमुखांनी ध्वज प्रदान परेडचे निरीक्षण केले आणि चार मेकॅनाइज्ड इन्फंट्री तुकड्यांच्या चाल व इन्फंट्री कॉम्बॅट व्हेइकलवर आधारित तुकड्यांनी दाखवलेल्या अचूक मानकांचे कौतुक केले. भारताचे राष्ट्रपती यांच्यावतीने त्यांनी या तुकड्यांना राष्ट्रपतींचा ध्वज प्रदान करून त्यांच्या देशसेवेतील योगदानाचा सन्मान केला. त्यांनी सर्व सैनिकांचे, विशेषतः सन्मानित तुकड्यांचे अभिनंदन केले आणि युद्ध व शांतता या दोन्ही परिस्थितीत मेकॅनाइज्ड इन्फंट्रीच्या व्यावसायिकतेचे कौतुक केले. भारतीय सैन्याच्या या तरुण व बहुपयोगी शाखेने पायदळ व यांत्रिक सैन्याचे सर्वोत्तम तत्त्व आत्मसात केले आहे. त्यांच्या तुकड्यांनी आपल्या शौर्य व कौशल्यामुळे सर्व लढाऊ क्षेत्रांमध्ये आणि संयुक्त राष्ट्र शांतता राखीव मोहिमांमध्ये योगदान दिले आहे.