उमेरड एमआयडीसी स्फोटातील मृतकांच्या कुटुंबीयांना मोठी मदत:प्रत्येकी 60 लाख रुपये, जखमींना 30 लाख आणि कुटुंबातील एकाला नोकरी

उमेरड एमआयडीसीमधील एमएमपी कंपनीत ११ एप्रिल रोजी झालेल्या भीषण स्फोटाच्या घटनेत मृत पावलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना मोठी मदत जाहीर करण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात महत्वाची माहिती दिली. मृतकांच्या कुटुंबीयांना कंपनीकडून ५५ लाख आणि शासनाकडून ५ लाख रुपये अशी एकूण ६० लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. जखमी कामगारांना कंपनीकडून ३० लाख रुपये मिळतील. त्यांच्यावर शासनाच्या वतीने मोफत उपचार केले जातील. या दुर्घटनेत पियुष दुर्गे, सचिन मसराम, निखिल शेंडे, अभिलाष जंजाळ आणि निखिल नेहारे यांचा मृत्यू झाला. मनीष वाघ, करण शेंडे, नवनीत कुमरे, पियुष टेकाम, करण बावणे आणि कमलेश ठाकरे हे गंभीर जखमी झाले. सर्व मृतक आणि जखमी कामगार उमरेड आणि भिवापूर तालुक्यातील आहेत. घटनेनंतर पालकमंत्री बावनकुळे आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. मृतक आणि जखमी कामगारांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला कंपनीत नोकरी देण्यात येणार आहे. शासन कामगारांच्या कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.