जी काही राहिली आहे ती संभाळा:त्यांना आता हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार आहे का?, दादा भुसेंचा संजय राऊतांना टोला
हिंदूंवरील अत्याचाराला भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊतांनी जी काही थोडी राहिली आहे, ती संभाळावी. त्यांना आता हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार आहे का? असा खोचका सावळा दादा भुसे यांनी विचारला आहे. आमदार दादा भुसे म्हणाले, संजय राऊतांविषयी फार बोलून मला त्यांना महत्व द्यायचे नाही. कदाचित संजय राऊताचे डोके त्या ठिकाणी तसे चालले नसते तर शिवसेनेला हा दिवस बघायला मिळाला नसता. लोकसभेत जागा कमी झाल्या, विधानसभेला 20 जागा मिळाल्या त्याचे आत्मचिंतन करण्याची राऊतांना गरज आहे. त्यावर वेळ न घालवता राऊत वेडे वाकडे बोलतात. आज ते हिंदुत्वावर बोलत होते. मला हसू आले, खरंच राऊतांना आता हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार आहे का?, असा प्रश्न दादा भुसे यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत काय म्हणाले?
दरम्यान, सध्या दिल्ली येथे संसदीय अधिवेशन सुरू आहे. सभागृहात बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावरून भाजप पक्षावर निशाणा साधला जात आहे. यावरच संजय राऊत म्हणाले, जगातला हिंदू संकटात आहे तो फक्त मोदी, शाह आणि भाजप यांच्या स्वार्थामुळेच. सुप्रीम कोर्टाने याला फूस लावली. देशात निवडणुका जिंकण्यासाठी जी ठिणगी भाजपने टाकली, त्याचा परिणाम जगात हिंदू ज्या ज्या भागात मोठ्या प्रमाणावर आहे तिथे होत आहे. नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान या ठिकाणी हिंदूंवर हल्ले होत आहेत. याला जबाबदार नरेंद्र मोदी यांचे धोरण आहेत. निवडणुका जिंकण्यासाठीची धोरणे याला जबाबदार असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, भारतात सातत्याने दंगे घडवायचे आणि मुसलमानांना टार्गेट करायचे. प्रार्थना स्थळे खोदण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. आता याचा परिणाम इतर देशातील हिंदूंवर होत आहे. मोदींच्या सरकारमध्ये एवढी ताकद नाही की, ते बांगलादेशमध्ये जाऊन हिंदूंवरील हल्ले थांबवतील. नरेंद्र मोदी यांचे परराष्ट्र धोरण बांगलादेशमध्ये हिंदू असुरक्षित असण्याला जबाबदार आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.