बस फलाटात घुसली; महिन्यात दुसरी घटना:एसटीचे मध्यवर्ती आगार प्रवाशांसाठी जीवघेणे
एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती बसस्थानकावर गुरुवारी पहाटे एक बस थेट फलाट तोडत आगारात घुसली. सुदैवाने यावेळी प्रवाशी नसल्याने कुठलिही जीवितहानी झाली नाही. मात्र, एका महिन्यात अशाप्रकारची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी २४ ऑक्टोबर रोजी असाच अपघात झाला. यामुळे एसटीचे मध्यवर्ती अर्थात आगार क्रमांक २ प्रवाशांसाठी जीवघेणे ठरत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गुरुवारी पहाटे छत्रपती संभाजी नगर आगारातील एमएच २०, बीएल ३२६४ गाडी अकोल्यातून निघायच्या तयारीत होती. चालकाने गाडी फलाटावर घेतली. गाडी मागे-पुढे करीत असताना, अंदाज चुकल्याने गाडी थेट फलाट तोडून बसस्थानकात घुसली. यावेळी बसमध्ये कुठलेही प्रवासी नव्हते, तसेच बसस्थानकावरही शांतता होती. अचानक झालेल्या या अपघातामुळे बसस्थानकावर धावपळ उडाली. नूतनीकरणानंतर वाढले स्थानकातील अपघात येत्या काळात अकोला आगारात दोन्ही फलाटाचा नूतनीकरण करण्यात होत आहे. सिमेंटिकरण नंतर संपूर्ण परिसर सपाट करण्यात आला आहे. फक्त प्रवासी आसन व्यवस्थेपुढे लहान सिमेंटची पार आहे. याची उंची कमी असल्याने अंदाज चुकत आहे. यामुळे अपघात होत आहेत.