दिव्य मराठी अपडेट्स:पुण्यात EVM विरोधात 95 वर्षीय बाबा आढाव यांचे आत्मक्लेश आंदोलन, छगन भुजबळांनी घेतली भेट

दिव्य मराठी अपडेट्स:पुण्यात EVM विरोधात 95 वर्षीय बाबा आढाव यांचे आत्मक्लेश आंदोलन, छगन भुजबळांनी घेतली भेट

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स… EVM विरोधात बाबा आढाव यांचे आत्मक्लेश आंदोलन पुणे – विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला दैदिप्यमान यश मिळाले. आता या यशामागे ईव्हीएमचा हात असल्याचा दावा केला जात आहे. काही मतदारसंघांतील आकडेवारीमुळे याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी गुरुवारी पुण्यात ईव्हीएमविरोधात 3 दिवस आत्मक्लेश आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला. विधानसभा निवडणुकीत लोकशाहीचे वस्त्रहरण झाले. ईव्हीएममध्ये घोटाळा झाला. ईव्हीएम व पैशाच्या वापरामुळे हा निकाल आला, असे ते म्हणालेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आंदोलनस्थळी जात आढाव यांची भेट घेतली. तसेच त्यांचे विचारही जाणून घेतली. आज पुण्यात मनसेची आत्मचिंतन बैठक पुणे – मनसेला विधानसभा निवडणुकीत मानहानीकरक पराभवाचा सामना करावा लागला. मनसेने 288 पैकी 128 जागा लढवल्या. परंतु यातील एकही जागा त्यांना जिंकता आली नाही. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील माहिम येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, मात्र मतदारांनी त्यांना नाकारले. अमित यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. पुणे शहरातील 8 पैकी 4 मतदारसंघात मनसेने उमेदवार दिले होते. मात्र तिथेही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज पुण्यातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून पक्षाच्या पराभवाची कारणमीमांसा करणार आहेत. या बैठकीला पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्रातील पराभूत उमेदवार व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुंबई व ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला होता. भुजबळांकडून ज्योतिबा फुले यांना अभिवादन नाशिक – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या 134व्या स्मृती दिनानिमित्त मुंबई नाका येथे फुले स्मारकात मंत्री छगन भुजबळ यांनी क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले. यावेळी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, डॉ.शेफाली भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव, आरपीआय आठवले गट जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष एड रवींद्र पगार, विष्णुपंत म्हैसधूने, आनंद सोनवणे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक, गोरख बोडके, समता परिषदेचे प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर,युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे,युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, समता परीषद जिल्हाध्यक्ष प्रा.ज्ञानेश्वर दराडे, डॉ.योगेश गोसावी,महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्षा कविता कर्डक, माजी नगरसेविका सुनीता निमसे, समता परिषदेच्या जिल्हाध्यक्षा पूजा आहेर, शहराध्यक्षा आशा भंदुरे, संजय खैरनार, बॉबी काळे, अमोल नाईक, अमर वझरे, किशोरी खैरनार, मीनाक्षी काकळीज, चिन्मय गाढे, जीवन रायते, संदीप बत्तासे, योगेश कमोद, मोहन माळी यांच्यासह विविध पक्षांचे व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी फुले दाम्पत्याची वेशभूषा साकार करत अभिवादन कार्यक्रमात सहभाग नोंदविला. तसेच या प्रसंगी उपस्थितांनी जय ज्योती जय क्रांतीचे नारे दिले. महायुतीचे खातेवाटप जवळपास निश्चित मुंबई – राज्यात महायुतीचे सरकार येणार अन् भाजपचा मुख्यमंत्री होणार हे आता फिक्स झाले आहे. यातच आता भाजप अर्थ, गृह, आणि सामान्य प्रशासन ही महत्त्वाची 3 खाती आपल्याकडे ठेवणार असल्याचे समोर येत आहे. दरम्यान राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत आहे. तर भाजपचे 132 आमदार निवडून आले आहे. यातच काही अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे भाजप राज्यात सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. यात राज्यात वचक ठेवण्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारी ही 3 मंत्रालय भाजप स्वत:कडे ठेवणार असल्याचे बोलले जात आहे. वाचा सविस्तर महाराष्ट्राचा नवा कारभारी आज ठरणार? मुंबई/नवी दिल्ली – आज महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा होऊ शकते. त्यासाठी दिल्लीत महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. तूर्त पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल असे मानले जात आहे. मागील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला पोहोचलेत. वाचा सविस्तर पराभवानंतर शहाजी बापू पाटलांची प्रतिक्रिया:म्हणाले – आमदारकीपेक्षा मोठे काहीतरी घेऊन येतो, खचायला मी काय भिताड किंवा पूल आहे का? सांगोला – निवडणुकीत पडलो असलो तरी एक वर्षाच्या आत सांगोल्याच्या 14 गावातील शेतात पाणी नाही आले, तर राजकीय संन्यास घेईल, असे मोठे विधान शहाजी बापू पाटील यांनी केले आहे. ते सांगोला येथे आयोजित चिंतन बैठकीत बोलत होते. पराभवाने खचू नका…माझ्यावर विश्वास ठेवा, या आमदारकी पेक्षा मोठे कायतर घेऊन येऊन दाखवतो, असेही शहाजी बापू पाटील म्हणाले. वाचा सविस्तर संसद अधिवेशनाचा तिसरा दिवस, प्रियांकांनी घेतली शपथ नवी दिल्ली – संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा गुरुवारी तिसरा दिवस आहे. प्रियांका गांधी पहिल्यांदाच संसदेत पोहोचल्या. त्यांनी लोकसभेत खासदार म्हणून शपथ घेतली. यावेळी त्यांनी संविधानाची प्रत हातात घेतली. प्रियांकांसोबत त्यांच्या आई सोनिया आणि राहुल गांधीही संसदेत पोहोचले. प्रियांका यांनी वायनाड मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकली आहे. प्रियांका यांच्यासोबत नांदेडच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले रवींद्र चव्हाण यांनीही शपथ घेतली. वाचा सविस्तर पीएम मोदींना जीवे मारण्याची धमकी नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. वाचा सविस्तर BJPचा मुख्यमंत्री होणे स्वाभाविकच:छगन भुजबळ यांनी दिला भाजपच्या 132 च्या संख्याबळाचा दाखला; विरोधकांवरही निशाणा नाशिक – 132 आमदारांमुळे भाजपचा मुख्यमंत्री होणं स्वाभाविक आहे.तर EVM मशीनवर विरोधकांनी घेतलेल्या संशयावर बोलताना भुजबळ म्हणाले की, मला 2019 साली 56 हजारांहून जास्त लीड होते, ते यावेळी कसे कमी झाले. जर तसे असते तर माझे लीड वाढले असते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर टीम इंडिया कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानला जाणार नाही टीम इंडिया कोणत्याही परिस्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, जर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रिड मॉडेलला सहमती दिली नाही तर टीम इंडिया ही स्पर्धा खेळणार नाही. जर पीसीबीने या स्पर्धेचे आयोजन केले नाही, तर भारतही या स्पर्धेचे आयोजन करण्यास तयार आहे. ICC ने 29 नोव्हेंबरला बैठक बोलावली आहे, ज्यामध्ये स्थळाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. वाचा सविस्तर

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment