पुढील 10-15 दिवस ही क्लिप चालणार:ते डीलिट करु नका, वाल्मीकच्या ऑडिओ क्लिपवर सुरेश धसांची प्रतिक्रिया
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात वाल्मीक कराड आणि एका महिला पोलिस अधिकाऱ्यासोबत संवाद झाल्याचा दावा केला जात आहे. यावर आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुढील 15 दिवस ही क्लिप चालणार असल्याचे सुरेश धस यांनी म्हंटले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना सुरेश धस म्हणाले, वाल्मीक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याच्या ह्या व्हायरल क्लिपसंदर्भात माझे मत आहे, पुढील 10-15 दिवस हे चालणार आहे. या दोन महिला अधिकारी आहेत, त्यांना आकाने फोन केला आहे. किरकोळ केस सांगितली जात आहे, पण माध्यमांनी यासंदर्भात तपास करावा. मी यासंदर्भात अधिक उत्तर देणार नाही, असे सुरेश धस म्हणाले. पुढे बालताना सुरेश धस म्हणाले, मंत्रालयाची मीडिया म्हणजे राज्याची मीडिया आहे, तुम्ही तपास करा, असे धस यांनी माध्यमांना उद्देशून म्हटले. तसेच, त्या अधिकाऱ्याने स्पीकर ऑन कसा केला, सोडून दे असे कसे ते म्हणाले यासंदर्भात तपास करावा. पुढील 15 दिवस हे प्रकरण चालणार आहे, ही क्लिप डीलिट करु नका, असे सुरेश धस म्हणाले. दरम्यान, बीडमधील सायबर सेलच्या निशिगंधा खुळे आणि वाल्मिक कराड यांच्यातील हे संभाषण असल्याचे सांगण्यात येते. निशिगंधा खुळे यापूर्वी सायबर सेलमध्ये होत्या. आता त्यांची बदली गेवराईला झालीय. या संभाषणात किरकोळ गुन्हा आहे, द्या सोडून. असे वाल्मीक कराड म्हणताना ऐकू येत आहे. तसेच, संबंधित कार्यकर्त्याशी बोलताना इथे बाप बसलेले आहेत आपण, असा उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये झाला आहे. आमदार सुरेश धस यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. तसेच सुरेश धस यांनी अनेक मागण्या केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने परळी नगरपालिकेची स्पेशल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी धस यांनी केली आहे. तसेच जे पोलिस अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास 10 ते 17 वर्षांपासून एकाच ठिकाणी आहेत त्यांची बीड जिल्ह्याच्या बाहेर बदली करण्यात यावी अशीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे सुरेश धस यांनी केली आहे.