आचरेकरांसारखे खेळाडू कोणत्याच कोचने घडवले नाही:क्रिकेट बदललं तसं आमचं राजकारण बदललं, स्मरकाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी राज ठाकरेंचं भाषण

आचरेकरांसारखे खेळाडू कोणत्याच कोचने घडवले नाही:क्रिकेट बदललं तसं आमचं राजकारण बदललं, स्मरकाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी राज ठाकरेंचं भाषण

रमाकांत आचरेकर गुरुजी यांच्या स्मारकाचे लोकार्पण मुंबईत करण्यात आले. यावेळी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. सचिन तेंडुलकर हे आचरेकर सरांचे शिष्य आहेत. या प्रसंगी राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना भाषण देखील केले. रमाकांत आचरेकरांचे स्मारक आधीच व्हायला पाहिजे होते. आचरेकर सर म्हंटलं की सचिन तेंडुलकर हे एकच नाव आपल्या डोळ्यासमोर येतं. पण मला वाटत नाही जगात आचरेकर सरांनी जेवढे खेळाडू निर्माण केले आपल्या देशासाठी तेवढे जगात कुठल्या कोचने एवढे खेळाडू केले असतील असं मला वाटत नाही, असं राज ठाकरे म्हणाले. शिक्षक नावाची गोष्टच आपल्याकडे राहिलेली नाही पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, अनेक गोष्टी ज्यावेळी आपल्या देशात, महाराष्ट्रात होतात त्यावेळी अशा लोकांची खरं तर नावं द्यायला पाहिजेत. जेव्हा फ्लायओव्हर होतात, ब्रिज होतात, रस्ते होतात, आमच्याकडे सगळ्यात मोठा रस्ता तो महात्मा गांधी रोड आहे. पण महात्मा गांधींचे जे गुरु होते ते गोपळकृष्ण गोखले हे आमचं गोखले रोड, असं म्हणत राज ठाकरे यांनी लहान रस्त्याकडे बोट दाखवले. गुरुची काय किंमत असते आणि गुरुची काय किंमत असावी आणि त्याला किती पूजावं किती मोठं करावं आणि लोकांसमोर ठेवावं हे आपल्याकडे नाहीच, म्हणजे शिक्षक नावाची गोष्टच आपल्याकडे राहिलेली नाही, असं राज ठाकरे म्हणाले. माझ्याकडे जेव्हा दहावी बारावीची मुलं येतात, मी विचारतो मग काय करणार पुढे? मग ते म्हणतात इंजिनियर होणार, आर्किटेक्ट होणार, डॉक्टर होणार. एक विद्यार्थी मला आजपर्यंत बोललेला नाही की मला शिक्षक व्हायचं आहे. या देशात मुलांना शिक्षक व्हावंसं वाटत नाही त्या देशाचं पुढे काय होणार माहीत नाही मला. पण मला असं वाटतं की असलेले जे शिक्षक आहेत, असलेले जे गुरु आहेत, द्रोणाचार्य म्हणून अवॉर्ड द्यायचा पण द्रोणाचार्य म्हणून पूजायचं नाही. आपल्याकडे गुरुपौर्णिमा ही मोबाईलवर राहिली आहे मी दरवर्षी बघायचो आमच्या तिथेच आचरेकर सर राहायचे. दरवर्षी गुरुपौर्णिमेला सचिन तेंडुलकर न चुकता यायचे. आता आपल्याकडे गुरुपौर्णिमा ही मोबाईलवर राहिली आहे. हॅप्पी गुरुपौर्णिमा! हे हॅप्पी गुरुपौर्णिमा काय असतं हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. अजून एक मेसेज असतो, ज्या ज्या लोकांनी माझ्या आयुष्यासाठी जे केले आहे.. अरे त्यात मी आहे की नाही, मला का पाठवलं आहे? कल्पनाच नसते आम्हाला, असं राज ठाकरे म्हणाले. पुतळे खूप झाले आहेत आपल्याकडे राज ठाकरे म्हणाले, आचरेकर सरांचं योगदान इतकं मोठं आहे की त्यांचं इथं स्मारक व्हावं, असं मला पहिल्यापासून मनापासून वाटत होतं. आमचे सुनील रमणी यांच्याशी मी बोललो आणि त्यांना मी सांगितलं की असं असं आपण एक स्मारक बनवूया. पण मला इथे आचरेकर सरांचा पुतळा नको होता, कारण पुतळे खूप झाले आहेत आपल्याकडे. मी म्हणलं काही तरी वेगळं करूया, ज्यातून आचरेकर सरांची ओळख, योगदान या सगळ्या मुलांना पण कळेल येणाऱ्या. आचरेकर सरांनी जे संस्कार केले आहेत या खेळाडूंवरती ते यांच्याकडे बघून दिसतं आपल्याला. आमच्याकडे पण राजकारण बदलत गेलं जसं तुमच्याकडे क्रिकेट आता बदलत गेलं तसं आमच्याकडे पण राजकारण बदलत गेलं. तुमच्याकडे अंपायरनी आऊट दिल्यावर तुमच्याकडं थर्ड अंपायर असतो, गेल्या निवडणुकीला आम्हाला जर थर्ड अंपायर मिळाला असता तर मला वाटतं अनेक निर्णय बदलले असते. पण आमच्याकडे थर्ड अंपायर नसल्याने आम्हाला काही करता येत नाही. आपल्याकडे परवाणग्या मिळवणं सगळ्यात कठीण असतं. महानगरपालिका, राज्य सरकार यासगळ्यातून परवाणग्या मिळवणं इतकं कठीण असतं आपल्याकडे अनधिकृत काम करायला परवानगीची गरज लागत नाही. पण अधिकृत करायचं म्हणलं की परवानगी लागते. यामुळे स्मारक बनवण्यासाठी खूप वेळ गेला, असं म्हणत राज ठाकरे यांनी प्रशासनावर टीका केली आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment