जनता अहंकारी व्यक्तीची वाट लावल्याशिवाय राहत नाही:आमदार काशिनाथ दाते यांची खासदार लंकेंवर टीका
अहिल्यानगर जिल्ह्यात सातबारा – झिरो करण्याची भाषा करणाऱ्यांना जनतेने जमिनीवर आणले. लोकशाहीमध्ये अहंकारी व्यक्तीची वाट लावल्याशिवाय जनता शांत बसत नाही, अशी घणाघाती टीका आमदार काशिनाथ दाते यांनी खासदार नीलेश लंके यांचे नाव न घेता केली. तालुक्यातील निघोज येथे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार व मतदारांचे आभार मानण्याचा कार्यक्रमात आमदार दाते बोलत होते. विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध न करता विकासासाठी सहकार्य करावे, विकास कामांत सहभागी व्हावे असे आवाहन आमदार दाते यांनी केले. जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, प्रभाकर कवाद, सचिन वराळ, सागर मैड, पंकज कारखिले, विक्रम कळमकर, राजाराम एरंडे, सुधामती कवाद, भास्कर उचाळे, सरपंच चित्रा वराळ, मनोज मुंगशे उपस्थित होते. आमदार दाते म्हणाले, कोणत्याच क्षेत्रात अहंकार खपवून घेतला जात नाही. जनता डोक्यावरही घेते आणि जमिनीवरही आणते. महाभारत घडले ते फक्त अहंकारामुळे, त्यामुळे सत्तेची मस्ती कोणीही करू नये. मी फक्त विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली. निघोज आणि परिसराचा विकास करण्याचा शब्द अजित पवार यांनी दिला आहे. ते शब्दाचे पक्के आहेत. निघोजमधील विरोधकांनी विचार बदलावेत. विरोधाला विरोध करू नका. विकासाच्या मुद्द्यावर एक व्हा. तुमच्या परिसराचा विकास करून घ्या. मी या तालुक्याच्या विकासाची दृष्टी ठेवून काम करणार आहे. माझी जनता आणि माझ्या मतदारसंघात करावयाचा विकास हेच माझे ध्येय असणार आहे. तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. आपणाला शांततेने आणि संयमाने राजकारण करायचे आहे. तुम्ही माझ्यावर,आमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. आमच्या लाडक्या बहिणींनी जो विश्वास टाकला त्यांच कौतूक करावं तेवढं कमीच आहे. आमच्या बहिणी कुठल्याही आमिषाला बळी पडल्या नाहीत, असे आमदार दाते म्हणाले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला असेच यश द्या, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन शरद ठुबे यांनी केले. आमदार दाते विकासकामात कमी पडणार नाहीत आमदार दाते यांना समाजकारण राजकारणाचा ४० वर्षांचा अनुभव आहे. अजित पवार व राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून ते विकासकामात कमी पडणार नाहीत. पवारांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेली लाडकी बहिण योजना कमालीची लोकप्रिय झाली आहे. लाडक्या बहिणींनी विकासाभिमुख सरकार निवडल्याने त्यांना आता दीड हजारांऐवजी लवकरच एकवीसशे रुपये मिळणार आहेत. तसा शब्द अजित पवार यांनी दिलेला आहे, असे जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड सांगितले.