भाजपने सज्जाद नोमानीस हाताशी धरून व्हिडीओ प्रसारित केला:हिंदूना अफूच्या गोळ्या चारून षंढ बनवले जातेय; उद्धव ठाकरे गटाचा आरोप

भाजपने सज्जाद नोमानीस हाताशी धरून व्हिडीओ प्रसारित केला:हिंदूना अफूच्या गोळ्या चारून षंढ बनवले जातेय; उद्धव ठाकरे गटाचा आरोप

केरळ, आंध्र, तेलंगणा, जम्मू, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा, आसाम, दिल्ली, हरयाणात सध्या हिंदू असुरक्षित नाही. तेथे निवडणुका जाहीर होण्याआधी साधारण एक महिना हिंदू अचानक असुरक्षित बनेल व हिंदूंना सुरक्षित जगायचे असेल तर भाजपला मतदान करा, असे सांगण्यासाठी संघाच्या फौजा मतदारसंघांत फिरतील. देशातले ज्ञान, विज्ञान, संस्कार, संस्कृती, पुरोगामित्व, एकात्मतेचे हे अशा प्रकारे वाभाडे काढून कोणी निवडणुका जिंकणार असेल तर या देशाचे संविधान खतऱ्यात आहे. महाराष्ट्रात पाशवी बहुमत हे हिंदूंना भयभीत करून मिळवले असेल तर हिंदूंनी उगाच शौर्याच्या गप्पा मारू नयेत. वीर पुरुषांना जन्म देणारा हिंदू अफूच्या गोळ्या चारून षंढ बनवला जात आहे. त्यामुळे हिंदू धोक्यात आहे. हिंदूंना वाटण्याचे काम भाजप करत आहे, हे हिंदूंना समजेल तेव्हा वेळ हातची निघून गेलेली असेल. असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने भाजपवर निशाणा साधला आहे. या संदर्भात दैनिक सामना मधून ठाकरे गटाने टीका केली आहे. सामना मधील अग्रलेख देखील वाचा….. राज्यात महाविकास आघाडीचा पराभव झाला. त्या पराभवाची कारणमीमांसा आपापल्या पद्धतीने सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ ही घोषणा दिली. या घोषणेमुळे मतांचे ध्रुवीकरण झाले. त्यामुळे निवडणुकीचा विचार वेगळ्या वळणावर गेला, असे श्री. शरद पवार यांनी सांगितले आहे. पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यानेही हे मत मांडावे हे आश्चर्यकारक आहे. हिंदू मतांचे ध्रुवीकरण करून भाजप व त्यांच्या लोकांनी निवडणुकांवर प्रभाव पाडला. त्यामुळे जे व्हायचे ते झाले. त्यावर आता डोके फोडून काय उपयोग? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी 288 मतदारसंघांत 90 हजार बैठका घेतल्या व हिंदूंच्या मनात भय व असुरक्षितता निर्माण करण्याचा कार्यक्रम पार पाडला. जेथे शंभर टक्के हिंदू मतदार आहेत, तेथील हिंदूंना भय वाटण्याचे कारण नव्हते. पण भय हा असा प्रकार आहे, जो साथीच्या रोगाप्रमाणे पसरत जातो. भय नक्की कोणापासून होते? महाराष्ट्रात ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा चालला. मग योगींचा हाच ‘कटेंगे’चा नारा झारखंडसारख्या आदिवासी राज्यात का चालला नाही? झारखंडला आदिवासी आहेत व अनेक भागांत ते जंगलात राहतात. या कमी शिकलेल्या लोकांवर ‘बटेंगे कटेंगे’ची मात्रा लागू पडली नाही. हेमंत सोरेन यांच्यावर मोदी सरकारने जो अन्याय केला, त्याविरोधात झारखंडची जनता एकवटली व त्यांनी मोदी-शहांच्या योगी आदित्यनाथांचा पराभव केला, पण महाराष्ट्रातील सुशिक्षित जनतेला ‘भय’ वाटले. हे भय नक्की कोणापासून होते? योगी यांनी हिंदूंना सांगितले, एकत्र येऊन भाजपला मतदान करा, नाहीतर तुमच्या कत्तली होतील, हे भय योगींसारख्या नेत्याने निर्माण केले व त्यावर ‘एक है तो सेफ है’सारखे शिखर मोदी यांनी चढवले. महाराष्ट्रातील मतदारांना अशाप्रकारे भयभीत करण्याचा प्रकार घडला. भाजपने सज्जाद नोमानीस हाताशी धरून व्हिडीओ प्रसारित केला झारखंडमध्येही हाच प्रयोग झाला. तेथे झारखंड मुक्ती मोर्चा व काँग्रेस पक्षाची युती होती. ही युती विजयी झाली. महाराष्ट्राच्या जनतेला ‘बटेंगे’चे असे कोणते भय वाटले व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांवर 90 हजार बैठका घेण्याची वेळ का आली? हा संशोधनाचा विषय आहे. भाजपने सज्जाद नोमानीस हाताशी धरून उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याबाबत एक व्हिडीओ प्रसारित केला. तो पूर्णपणे खोटा व गैरसमज पसरवणारा होता. महाविकास आघाडीचा पराभव करण्यासाठी भाजपला हे असे भंपक उपद्व्याप करावे लागले. याचा स्पष्ट अर्थ असा की, भाजपला विजयाची खात्री नव्हती, पण त्यांच्या या अशा खटपटी व लटपटी चालू होत्या व त्या लटपटीत त्यांना शेवटी धर्माच्या कुबडय़ा घ्याव्या लागल्या. हे त्यांचे अपयश आहे.

राज्यात अफूचे बी टाकून गेले धर्म ही नशा आहे, अफूची गोळी आहे, असे कार्ल मार्क्सने सांगितले. त्या अफूचे वाटप संघ स्वयंसेवकांनी 90 हजार बैठकांत केले. त्यात अफूच्या विविध पुडय़ा व चूर्णाचे वाटप केले. योगी उत्तर प्रदेशातून आले व महाराष्ट्रासारख्या राज्यात अफूचे बी टाकून गेले. यात नुकसान झाले ते महाराष्ट्राचे. 2019 साली पुलवामा हत्याकांड घडले. त्यात चाळीस जवानांना प्राण गमवावे लागले. या हत्याकांडासही मोदींनी धार्मिक स्वरूप दिले, पण पुलवामामागचे खरे गुन्हेगार कोण? याचा शोध ते लावू शकले नाहीत. कश्मीरातील पंडितांची घरवापसी करू शकले नाहीत व पंडितांना आधार देण्यासाठी योगी महाराज कश्मीरात गेल्याचे दिसत नाही, पण महाराष्ट्रात अफूची खोकी घेऊन हे सर्व लोक आले व त्यांनी लोकांची डोकी बिघडवून टाकली. देशातले हिंदूंचे ऐक्य हा राज्यातील निवडणुकीचा विषय होऊ शकत नाही.

हिंदूंनी उगाच शौर्याच्या गप्पा मारू नयेत देशातला हिंदू खरेच असुरक्षित असेल तर त्याला मोदी व शहा जबाबदार आहेत. राज्य त्यांचे आहे व हिंदूंना अफूच्या गोळ्या चारून त्यांनी ते मिळवले आहे, पण निवडणुका आल्या की, ‘हिंदू असुरक्षित’ किंवा ‘बटेंगे तो कटेंगे’ या भयाखाली ठेवणारे निवडणूक झाल्यावर कोठे गायब होतात? देश अखंड आहे व एक आहे. केरळ, आंध्र, तेलंगणा, जम्मू, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा, आसाम, दिल्ली, हरयाणात सध्या हिंदू असुरक्षित नाही. तेथे निवडणुका जाहीर होण्याआधी साधारण एक महिना हिंदू अचानक असुरक्षित बनेल व हिंदूंना सुरक्षित जगायचे असेल तर भाजपला मतदान करा, असे सांगण्यासाठी संघाच्या फौजा मतदारसंघांत फिरतील. देशातले ज्ञान, विज्ञान, संस्कार, संस्कृती, पुरोगामित्व, एकात्मतेचे हे अशा प्रकारे वाभाडे काढून कोणी निवडणुका जिंकणार असेल तर या देशाचे संविधान खतऱ्यात आहे. महाराष्ट्रात पाशवी बहुमत हे हिंदूंना भयभीत करून मिळवले असेल तर हिंदूंनी उगाच शौर्याच्या गप्पा मारू नयेत. वीर पुरुषांना जन्म देणारा हिंदू अफूच्या गोळ्या चारून षंढ बनवला जात आहे. त्यामुळे हिंदू धोक्यात आहे. हिंदूंना वाटण्याचे काम भाजप करत आहे, हे हिंदूंना समजेल तेव्हा वेळ हातची निघून गेलेली असेल.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment