सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग:भाजप आज पर्यवेक्षकांच्या नावांची घोषणा करणार, देवेंद्र फडणवीसांसाठी राजनाथ सिंह लकी
महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकार स्थापन करण्यासाठी 1 डिसेंबर रोजी भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला जाईल. त्यामुळे पक्ष निरीक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भाजप आज पर्यवेक्षकांच्या नावांची घोषणा करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस सर्वात आघाडीवर आहेत. पण भाजप सरप्राईज देण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे पर्यवेक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी राजनाथ लकी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनाच महाराष्ट्रात पक्ष निरीक्षक म्हणून पाठवले जाण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली व ते राज्याचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा पर्यवेक्षेक म्हणून राजनाथ सिंह आले होते. त्यांच्यासोबत ओम माथूर यांचा समावेश होता. त्यावेळी एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला विनोद तावडे यांनी अनुमोदन दिले होते. तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांना युवा मोर्चाची जबाबदारी मिळाली तेव्हाही राजनाथ यांची भूमिका महत्त्वाची होती. एवढेच नाही तर फडणवीस यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली होती, तेव्हाही राजनाथ सिंह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. पण 2019 मध्ये भाजप व शिवसेनेच्या युतीला बहुमत मिळाले तेव्हा राजनाथ सिंह हे पक्ष निरीक्षक म्हणून आले नव्हते. भाजपनंतर महायुतीची बैठक सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर महायुतीच्या घटकपक्षांची बैठक होईल. या बैठकीत महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाची औपचारिक घोषणा केली जाईल. सद्यस्थितीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक सातारा जिल्ह्यातील आपल्या दरे या गावी गेल्यामुळे सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया मंदावली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, एकनाथ शिंदे यांना भाजपवर फारसा दबाव टाकता येणार नाही. कारण, भाजपच्या स्वतःच्या 132 जागा निवडून आल्या आहेत. एवढेच नाही तर काही अपक्ष आमदारांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या 41 आमदारांचाही त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे भाजप शिंदेंना बाजूला ठेवूनही सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आहे. हे ही वाचा… शरद पवारांकडून पुन्हा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह:म्हणाले – अखेरच्या 2 तासांतील टक्केवारी अत्यंत धक्कादायक, जनतेने उठाव करणे आवश्यक मुंबई – देशामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यासंबंधीची अस्वस्थता ती सर्व भागात दिसून येत आहे. या निवडणुकीच्या निकालाबद्दल जनमत हे बाबा आढाव यांनी घेतलेल्या भूमिकेतून व्यक्त होत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर दिसून आला. तो यापूर्वी कधीही बघितला नव्हता. स्थानिक पातळीवरील निवडणूक असतात, त्यामध्ये अशा तक्रारी कुठे न कुठे ऐकायला मिळतात. मात्र संपूर्ण राज्याची आणि देशाची निवडणूक असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची सर्व यंत्रणा हातात घ्यायची, असे चित्र यापूर्वी कधीही दिसले नव्हते, असे देखील पवार यांनी म्हटले आहे. असेच काही या निवडणुकीत महाराष्ट्रात घडले आहे आणि त्याचा परिणाम होऊन लोकांची अस्वस्थता वाढली असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर