धरसोडीच्या भूमिकेमुळे 5 वर्षांत वंचितचा एकूण व्होट शेअर तिपटीने घसरला:यंदा मविआच्या 19 उमेदवारांची ‘शिकार
महाविकास आघाडीतील नेत्यांना धडकी भरवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या व्होट बँकेची ४ निवडणुकांमध्ये चांगलीच पडझड झाली आहे. २०१९ च्या तुलनेत मताधिक्य निम्म्याने कमी झाले. या वेळी विरोधी पक्षाच्या १९ उमेदवारांची शिकार करण्यात ‘वंचित’ला यश आले, तर ‘वंचित’मुळे महाविकास आघाडीचेही ४ उमेदवार विजयी झालेत. २०१९ च्या विधानसभेत २५ लाख मते होती. या वेळी १२ लाख घटून फक्त १३ लाखांपर्यंत आले आहेत. धीरज देशमुख, दिलीप सानंदा, वसंत पुरके आणि इम्तियाज जलील यांनाही ‘वंचित’मुळेच पराभावाचे तोंड पाहावे लागले आहे. १९८४ पासून म्हणजेच ४० वर्षांपासून प्रकाश आंबेडकर राजकारणात आहेत. ४० पैकी ३६ वर्षे त्यांच्या पक्षाचे नाव ‘भारिप-बहुजन महासंघ’ होते. पण १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमाप्रकरणी उसळलेल्या दंगलीतील त्यांच्या भूमिकेमुळे अचानक त्यांचा जनाधार वाढला. त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगरात २ ऑक्टोबर २०१८ रोजी जबिंदा लॉन्सला सभा घेतली. तिथे एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसींसमवेत आघाडी केली. तेव्हापासून त्यांनी ‘भारिप’ऐवजी २ लोकसभा आणि २ विधानसभेच्या निवडणुका ‘वंचित’तर्फे लढवल्या. आधी एमआयएम, नंतर महाविकास आघाडीने त्यांना साद घातली. पण त्यांनी त्यांना दूर सारले. ‘एकला चलो रे’च्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीचे नुकसान तर झालेच, पण स्वत:चीही व्होटबँक घसरली. बाळापुरच्या एकमेव उमेदवाराने दिली झुंज बाळापूरमधील एस. एन. खातिब या एकमेव उमेदवाराला दुसऱ्या पसंतीची (७०,३४९) मते घेता आली. वंचितने सत्ताधाऱ्यांच्याही ४ उमेदवारांची शिकार केली. त्यात महाविकास आघाडीच्या ४ उमेदवारांना विजश्री मिळवता आली, असे आकडेावारी सांगत आहे.