[ad_1]

पुणे : महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ. आशिष श्रीनाथ बंगिनवार (वय ५४, पद –अधिष्ठाता) यांना १६ लाख रूपयाच्या लाचेतील पहिला हप्ता म्हणून १० लाख रूपयाची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. डॉ. बंगिनवार यांना आता १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र या प्रकरणाचे धागेदोरे खोलवर असल्याची शक्यता असल्याने या प्रकरणाचा कसून तपास सुरु आहे.

डॉ. बंगिनवार यांच्या चौकशीमधून महापालिकेने स्थापन केलेल्या वैद्यकीय ट्रस्टमधील काही ट्रस्टींची नावे समोर येण्याची शक्यता आहे. डॉक्टर बंगिनवार हे तीन वर्षांपूर्वी गुजरातमधील सिल्वासा येथे वैद्यकीय प्राध्यापक म्हणून कामावर रुजू होते. त्यानंतर त्यांची पुण्यात अधिष्ठाता म्हणून झालेली नियुक्ती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. डॉ. बंगिनवार यांची अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यामागे कोणाचा हात होता? याचा तपास आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे.

शिक्षणाच्या माहेरघरात खळबळ, डीनने प्रवेशासाठी १६ लाखांची लाच मागितली अन् जाळ्यात अडकला
दरम्यान, ज्यावेळेस हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला त्यावेळेस एका ट्रस्टची स्थापना करण्यात आली. कारण महापालिका अशा पद्धतीने महाविद्यालय चालवू शकत नाही. या ट्रस्टमध्ये २४ विश्वस्त होते त्यापैकी १२ हे महानगरपालिका लोकप्रतिनिधी तर बारा प्रशासकीय अधिकारी अशा पद्धतीने होते. त्यामुळे बंगिनवार यांच्या चौकशीत आता काही विश्वस्त या सगळ्या प्रकरणात सहभागी आहेत का? हे कोडं उलगडणार आहे. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे किती खोलवर पोहोचले आहेत या सगळ्याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

काय आहे प्रकरण ?

अधिष्ठाता आशिष बंगिनवार यांना १६ लाख रूपयाच्या लाचेतील पहिला हप्ता म्हणून १० लाख रूपयाची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यानंतर आशिष बंगिनवार यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एका ४९ वर्षीय डॉक्टरने तक्रार दिली आहे.

अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, तलाठ्यानं ५ हजारांची लाच चावून ‘खाल्ली’!

तक्रारदार डॉक्टर यांचा मुलगा NEET परिक्षा – २०२३ मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एम.बी.बी.एस.च्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कॅप राऊंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे इन्स्टिट्यूशनल कोटामधून निवड झाली होती. यासाठी २२ लाख ५० हजार रुपये इतके प्रवेश शुल्क होते. मात्र महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी १६ लाख रुपये लाचेच्या स्वरूपात मागितले होते.

तक्रारदार डॉक्टरच्या मुलाचा पहिला कॅप राऊंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालय, पुणे येथे इन्स्टिटयुशनल कोटा मधून निवड झाली होती. या निवड यादीचे आधारे तक्रारदार हे आशिष बंगिनवार यांना मुलाच्या एमबीबीएसच्या महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेसाठी भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी बंगिनवार यांनी दरवर्षाची शासनमान्य विहीत फी २२ लाख ५० हजार रूपये व्यतिरिक्त प्रवेशासाठी १६ लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली.

अधिष्ठाता यांनीच लाच मागिल्यानंतर तक्रारदार यांनी लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी आशिष बंगिनवार यांनी तक्रारदार यांच्या मुलाचे एमबीबीएसच्या प्रवेशासाठी तडजोडीअंती १६ लाख रूपये लाच म्हणून मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यापैकी पहिला हप्ता म्हणून १० लाख रूपये बंगिनवार यांनी त्यांच्याच कार्यालयात घेतले. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सरकारी पंचासमक्ष त्यांना रंगेहात पकडले आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *