समाजमाध्यमावर असताना जुहूच्या संदीप (बदललेले नाव) याची हेलेन या तरुणीसोबत ओळख झाली. टेलिग्रामवर दोघेही एकमेकांसोबत चॅटिंग करू लागले. हेलेन हिने ती मूळची चीन देशाची असून सध्या न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास असल्याचे सांगितले. तिने भारतामध्येही येऊन व्यवसाय करण्याची इच्छा असल्याचे बोलून दाखविले.
संदीपसमोर हेलेन हिने गुंतवणुकीचे अनेक पर्याय ठेवले. काका न्यूयॉर्क येथे बँकिंग क्षेत्रात मोठ्या हुद्द्यावरून निवृत्त झाले असून त्यांच्या सल्ल्यानुसार बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास चांगली रक्कम मिळत असल्याचे तिने संदीपला सांगितले. संदीपने तिला याबाबतची प्रक्रिया विचारली. तिने संदीपला टेलिग्रामच्या एका ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. या ग्रुपमध्ये सर्व सदस्यांमध्ये गुंतवणुकीबाबत चर्चा सुरू असल्याचे आणि त्यांना झालेला नफा याबाबत माहिती असल्याचे संदीपने पाहिले.
हेलेन हिने संदीपला एक संकेतस्थळावर जाऊन स्वतःचा आणि बँक खात्याचा तपशील भरण्यास सांगितला. त्यानंतर हेलन सांगेल त्याप्रमाणे संदीप तिने दिलेल्या बँक खात्यावर पैसे पाठवत होता. गुंतवणुकीवर झालेला नफा त्याला वॉलेटमध्ये दिसत होता. त्यामुळे आपले पैसे फुकट जात नसल्याचे त्याला वाटले. त्यानुसार थोडे थोडे करून सुमारे ८५ लाख रुपये संदीपने बिटकॉइनमध्ये गुंतविले. ज्यावेळी पैशाची गरज भासली, त्यावेळी वॉलेटमधील जमा रक्कम स्वतःच्या बँक खात्यावर वळविण्याचा संदीप प्रयत्न करीत होता. मात्र पैसे काही केल्या ट्रान्सफर होत नव्हते. त्यामुळे त्याने हेलेन हिने दिलेल्या संकेतस्थळाबाबत माहिती काढली असता न्यूझीलंड येथील एका ट्रेडिंग कंपनीच्या संकेस्थळासोबत अगदी हुबेहूब दिसणारे संकेतस्थळ सुरू करून फसविण्यात आल्याचे लक्षात आले. हेलेन हिचाही संपर्क होत नसल्याने संदीपला खात्री झाली आणि त्याने याबाबत सायबर पोलिसांत धाव घेतली.