[ad_1]

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरील झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे त्यांच्यावर गोळीबार केलेल्या मॉरिस भाईने स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस यांच्यामध्ये पूर्वी वैमनस्य होते. एका गुन्ह्यामध्ये मॉरिस याला तुरुंगात जावे लागले होते. यामागे अभिषेक यांचा हात असल्याचा त्याला संशय होता. या गुन्ह्यातून बाहेर आल्यानंतर मॉरिस याने अभिषेक यांच्यासोबत जवळीक साधली होती. पैसे आणि मालमत्तांचे व्यवहार यावरूनही दोघांमध्ये वाद असल्याचे म्हटले जात आहे. या सर्व वादाचा सूड म्हणूनच मॉरिस याने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.

उल्हासनगर येथील पोलिस ठाण्यात भाजप आमदाराने केलेल्या गोळीबाराच्या घटनेचा धक्का कायम असतानाच बोरिवलीमधील एका स्थानिक कार्यकर्त्याने गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या केली. साडीवाटपाच्या कार्यक्रमासाठी बोलावून मॉरिस नरव्होना या कार्यकर्त्याने घोसाळकर यांच्यासमवेत ‘फेसबुक लाइव्ह’ केला व नंतर अभिषेक यांच्यावर दोन-तीन गोळ्या झाडल्या. यानंतर याने स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली.

बोरिवली पश्चिमेकडील आयसी कॉलनीमध्ये मॉरिस याचे कार्यालय आहे. गुरुवारी सायंकाळी त्याच्या कार्यालयामध्ये गरीब महिलांना साडीवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मॉरिस याने अभिषेक यांना बोलावले. मॉरिस याच्या पेजवरून त्याच्या कार्यालयात बसून दोघांनी ‘फेसबुक लाइव्ह’ केले. दोघांनी एकत्र कोणते सामाजिक उपक्रम हाती घेतले, याबाबतची माहिती दिली. ‘फेसबुक लाइव्ह’ संपताच मॉरिस याने त्याच्याकडील बंदुकीतून अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या. दोन ते तीन गोळ्या झाडल्यानंतर त्याने त्याच बंदुकीतून स्वतःवरही गोळ्या झाडून घेतल्या. गोळीबाराचा आवाज ऐकून कार्यालयाबाहेरील कार्यकर्ते, नागरिकांमध्ये विशेषतः महिलांमध्ये घबराट पसरली व सर्वजण सैरावैरा पळू लागले.

गोळीबाराचा आवाज थांबताच अभिषेक यांचे कार्यकर्ते कार्यालयात गेले असता, त्यांनी अभिषेक आणि मॉरिस यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले. दोघांनाही तेथील नागरिकांनी करुणा रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस, गुन्हे शाखेची पथके रुग्णालय, घटनास्थळी पोहचली. तसेच घोसाळकर यांचे वास्तव्य असलेल्या दहिसर येथील रतन नगर परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला. गोळीबाराच्या घटनेमुळे बोरिवली, दहिसर परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण आहे.

‘चांगल्या कामासाठी एकत्र आलोय’

‘आमच्या दोघांमध्ये काही गैरसमज होते; आमच्या कार्यकर्त्यांमध्येही होते. परंतु आता आम्ही चांगल्या कामासाठी एकत्र आलो आहोत. असे मृत्यूपूर्वी करण्यात आलेल्या ‘फेसबुक लाइव्ह’मध्ये अभिषेक घोसाळकर म्हणाले. ‘नवीन वर्ष आहे, चांगली सुरुवात आहे. गरिबांसाठी यापुढेही असे काम करत राहू’, असे यावेळी घोसाळकर यांनी मृत्यूपूर्वी अवघ्या काही क्षणांपूर्वी सांगितले होते.

राजकीय कुटुंब

अभिषेक यांचे वडील विनोद घोसाळकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार आहेत. अभिषेक हे तसेच त्यांची पत्नी तेजस्विनी ही देखील राजकारणात सक्रिय असून, दोघेही माजी नगरसेवक आहेत. आई, भाऊ आणि दोन लहान मुले असा अभिषेक यांचा परिवार आहे.

आदित्य ठाकरे संतापले, अभिषेक घोसाळकर यांच्यावर हल्ल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *