[ad_1]

पालमपूर: देशाच्या राजधानीत पाळीव श्वानांनी केलेल्या हल्ल्यांच्या बातम्या गाजत असताना उत्तरेकडील हिमाचल प्रदेशात पाळीव श्वानाची एक हृदयद्रावक कहाणी समोर आली आहे. या श्वानाने अपघातात मृत पावलेल्या आपल्या मालकाचे पार्थिव तब्बल दोन दिवस राखले. तेही अत्यंत प्रतिकूल हवामानात म्हणजेच एका बर्फाळ दरीत, जे जंगली श्वापदांचे क्षेत्र समजले जाते. अपघातात दगावलेला श्वानाचा मालक आणि अन्य एक व्यक्ती दोघेही, पुण्याचे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनंदन गुप्ता हे अल्फा या त्यांच्या जर्मन शेफर्ड जातीच्या पाळीव श्वानाबरोबर हिमाचल प्रदेशात गेले होते. बिर गावानजीक चोगन येथे पॅराग्लायडरच्या लँडिंगसाठी असलेल्या जागेकडे चालत परतत असताना अभिनंदन आणि त्यांची सहकारी पर्णिता बर्फामुळे निसरड्या झालेल्या वाटेवरून खोल दरीत कोसळले. दरीतून वर येण्याचा त्यांचा प्रयत्न असफल ठरला. पडल्यामुळे झालेल्या इजांमुळे त्यांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितल्याचे आएएनएस या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. गेल्या शनिवारी ही घटना घडली, तेव्हा अल्फा त्यांच्याबरोबरच होता. आजूबाजूला बर्फच बर्फ, कडाक्याची थंडी, बिबट्या व अस्वलांचा धोका आणि दरीत पडल्याने शरीराला झालेल्या जखमा, अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतही ‘अल्फा’ तेथून हलला नाही. बचावपथक येईपर्यंत तब्बल ४८ तास तो या दोन्ही पार्थिवांचा श्वापदांपासून बचाव करण्यासाठी तेथे थांबून होता. पोलीस आणि स्थानिकांचे बचावपथक अखेर मंगळवारी अपघातस्थळी पोहचले. दरम्यान, अभिनंदन यांचा ठावठिकाणा समजत नसल्याने यांच्या मेव्हण्याने रविवारीच हिमाचल प्रदेश पोलिसांशी संपर्क साधला होता. त्यानंतर शोध सुरू झाला. बचावपथक ज्या वेळी घटनास्थळी पोहचले, तेव्हा अल्फा त्याच्या मालकाच्या पार्थिवाभोवती घुटमळत होता. दोन दिवस उपाशी असूनही तो जागेवरून दूर गेला नव्हता. अत्यंत प्रतिकूल हवामानातही तो वाचला, असे ठाणे अंमलदार दिलीप सोळंकी यांनी सांगितले.ते म्हणाले, श्वानाने पोलीस आणि बचावपथकातील लोकांना पार्थिवाजवळ येऊ दिले. त्यानंतर मृतदेह बिर गावात नेईपर्यंत श्वान मागे मागे येत राहिले. गुप्ता यांचे कुटुंबीय वैद्यनाथ येथे पोचल्यावर मृतदेह आणि श्वान त्यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर त्यांना पठाणकोटला नेण्यात आले. तेथून ते पुण्यात परतणार होते.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *