[ad_1]

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी राज्य सरकारकडून सध्या सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, गेल्या तीन दिवसांमध्ये अनेकदा चर्चा होऊनही उपोषण मागे घेण्यासंदर्भात कोणताही तोडगा निघाला नव्हता. परंतु, मनोज जरांगे यांच्यावतीने एका शिष्टमंडळाने मुंबईत राज्य सरकारशी चर्चा केल्यानंतर उपोषणासंदर्भात तोडगा निघण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आतापर्यंत मनोज जरांगे-पाटील यांच्याशी राज्य सरकारच्यावतीने चर्चा करण्यात माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. शुक्रवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर मनोज जरांगे यांचे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तब्बल अडीच तास चर्चा झाली. यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या कुणबी प्रमाणपत्रांसंदर्भातील जीआरमध्ये बदल करण्याची तयारी दर्शविली आहे. ही चर्चा सकारात्मक झाल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. तसेच चर्चेसाठी मुंबईत शिष्टमंडळ पाठवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जरांगे-पाटील यांचे आभारही मानले. त्यामुळे आता मनोज जरांगे-पाटील हे राज्य सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात ठोस कार्यवाही करण्यासाठी काही दिवसांची मुदत देऊन उपोषण मागे घेतील, अशी शक्यता आहे.

सह्याद्री अतिथीगृहावरील चर्चेनंतर अर्जुन खोतकर यांच्यासह मनोज जरांगे-पाटील यांचे शिष्टमंडळ पुन्हा जालन्याकडे रवाना झाले होते. हे शिष्टमंडळ विमानतळावर आले तेव्हा अर्जुन खोतकर यांच्या हातात एक बंद लिफाफा होता. या लिफाफ्यात राज्य सरकारचा अंतिम प्रस्ताव असल्याचे समजते. आज दुपारी ११ ते १२ च्या सुमारास अर्जुन खोतकर हा लिफाफा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सोपवतील आणि पुढील चर्चा करतील. त्यानंतर मनोज जरांगे-पाटील आपले उपोषण मागे घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा १२ वा दिवस आहे. त्यांची प्रकृती सातत्याने खालावत आहे. ते सध्या फक्त पाणी आणि सलाईनच्या आधारे दिवस कंठत आहेत. राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र न दिल्यास उपोषण आणखी तीव्र करण्याचा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला होता. मनोज जरांगे यांनी शुक्रवारी नागरिकांशी संवाद साधला. या वेळी त्यांची आई आणि कुटुंबीय उपस्थित होते. ‘राज्य सरकार मराठा आरक्षणाचा निर्णय घेत नसेल तर आज, शनिवारपासून पाणीही पिणार नाही आणि सलाइन लावून घेणार नाही,’ असे त्यांनी सांगितले. संवाद साधत असताना जरांगे यांना अश्रू अनावर झाले होते. त्यामुळे आजच्या चर्चेत अर्जुन खोतकर यांनी आणलेला प्रस्ताव जरांगे-पाटलांना मान्य होईल का, हे पाहावे लागेल.

आरक्षणासाठी रान पेटवलं, आई पहिल्यांदाच स्टेजवर येताच जरांगेंना अश्रू अनावर; हुंदका देत म्हणाले…

‘ओबीसी-मराठ्यांमध्ये भांडणे लावण्याचा प्रकार’

राज्यात ओबीसी आणि मराठा समाजात भांडणे लावण्याचा उद्योग राज्य सरकारकडून सुरू असून, आरक्षणाच्या प्रश्नावर सत्ताधारी भाजप राजकारण करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा माजी आमदार विद्या चव्हाण यांनी केला आहे.

आमच्याकडे वंशावळीचे दस्ताऐवज नाहीत, सरकारने जीआरमध्ये सुधारणा करावी, आंदोलन सुरुच ठेवणार: मनोज जरांगे

राज्यात अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाबाबत आंदोलने सुरू आहेत. राज्य सरकारने केंद्राकडे मागणी करून विशेष अधिवेशनात ५० टक्क्यांची मर्यादा वाढवून द्यावी. जेणेकरून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा होईल, असे त्या म्हणाल्या. देशातील अन्य आठ राज्यांमध्येदेखील ५० टक्क्यांची अट ही सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा साहनी प्रकरणात दिलेल्या अटीमुळे आरक्षण देण्यात अडथळा आणत आहे. त्यामुळे भाजपने संसदेच्या विशेष अधिवेशनात हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली.

आईच्या पायावर डोकं, अश्रूंना वाट मोकळी; मनोज जरांगे पाटील भावूक

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *