चेन्नईच्या मनाडीजवळील कोट्टावलचावडीमधील वीरभद्र मंदिरात पेट्रोल बॉम्ब टाकल्याच्या आरोपाखाली ३९ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली. मुरलीकृष्णन असं त्याचं नाव आहे. अटक केल्यावर पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. त्यानं सांगितलेला घटनाक्रम आणि मंदिरात बॉम्ब टाकण्यामागचं कारण ऐकून पोलिसांना धक्काच बसला. देवाची प्रार्थना करायचो. पण त्यानं मनोकामना पूर्ण केली नाही. त्यामुळे रागाच्या भरात मंदिरावर हल्ला केल्याचं मुरलीकृष्णननं पोलिसांना सांगितलं.
आरोपी मुरलीकृष्णन ब्रॉडवे जवळच्या सेव्हन हिल्स परिसरात राहतो. अतियप्पा आणि गोविंदप्पा रस्त्यांच्या जंक्शन परिसरातील वीरभद्र स्वामी मंदिराजवळ तो ड्रायफु्ट्सचा व्यवसाय करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दररोज मंदिरात जायचा आणि देवदर्शनानंतर मुख्य पुजाऱ्याला भेटायचा. शुक्रवारी सकाळी पावणे नऊ वाजता तो मंदिरात गेला. त्यानं गाभाऱ्यात पेट्रोल पंप फेकला. तिथे असलेल्या पोलिसांनी त्याला लगेच अटक केली.
या प्रकरणी पोलिसांनी मुरलीकृष्णनची चौकशी केली. ‘माझी प्रकृती ठीक नाही. तब्येतीला आराम पडावा यासाठी मी दररोज देवाकडे प्रार्थना करतो. पण माझी प्रार्थना देवानं ऐकली नाही. त्यामुळेच रागाच्या भरात मंदिराच्या गाभाऱ्यात पेट्रोल बॉम्ब टाकला,’ असं आरोपीनं पोलीस चौकशीत सांगितलं. मुरलीकृष्णन सध्या पोलिसांच्या अटकेत आहे.
बॉम्ब फेकतेवेळी मुरलीकृष्णन नशेत होता अशी माहिती पोलिसांनी दिली. मंदिराजवळील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासलं. त्यात मुरलीकृष्णन एका चहाच्या टपरीवर खुर्चीत बसलेला दिसत आहे. तो एका काचेच्या बाटलीत पेट्रोल भरताना पाहायला मिळत आहे. काचेची बाटली कपड्यानं झाकून तो तिच्या आतमध्ये आग लावताना दिसला. आरोपीविरोधात हत्येचा प्रयत्न आणि अन्य गुन्ह्यांची आधीपासून नोंद आहे.