ठिकाण कोएंबतूर, दुलीप चषकाचा अंतिम सामना.. २१ सप्टेंबरला सुरू झालेला सामना २५ सप्टेंबरला संपला. पश्चिम विभाग विरुद्ध दक्षिण विभाग यांच्यात हा सामना खेळवण्यात आला. पश्चिम विभागाचं नेतृत्त्व अजिंक्य रहाणेनं केलं. त्याच्या संघानं हा सामना २९४ धावांनी जिंकला. त्यात यशस्वी जैस्वालदेखील खेळला होता. पहिल्या डावात केवळ १ धावा काढणाऱ्या यशस्वीनं दुसऱ्या डावात २६५ धावा चोपल्या. त्याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

दुलीप चषकाच्या अंतिम फेरीत द्विशतक झळकावणाऱ्या यशस्वीचं नाव इतिहासात नोंदवलं गेलं. पण त्यासोबतच या सामन्यात आणखी एक प्रकार घडला. अंतिम सामन्याच्या शेवटच्या दिवशी मोठा गदारोळ झाला. पश्चिम विभागाचा कर्णधार अजिंक्य रहाणेनं त्याचा संघ सहकारी यशस्वी जैस्वालला मैदानातून बाहेर काढलं. यशस्वीनं शिस्त मोडल्यानं रहाणेनं त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. या सामन्यात यशस्वी वारंवार दक्षिण विभागाच्या फलंदाजांना, विशेषत: रवी तेजाला स्लेज करत होता.

पंचांनी यशस्वीला दोन, तीनदा इशारा दिला. पण डावाच्या ५७ व्या षटकातही पुन्हा यशस्वीनं तोच प्रकार केला. यानंतर कर्णधार रहाणेनं पंचांसोबत काही मिनिटं संवाद साधला. त्यानंतर यशस्वीला मैदान सोडावं लागलं. विशेष म्हणजे पंचांनी पश्चिम विभागाला बदली क्षेत्ररक्षकाचीही परवानगी दिली नाही. त्यामुळे काही षटकं १० खेळाडूंसोबत क्षेत्ररक्षण करावं लागलं.

अजिंक्यनं खरडपट्टी काढल्यानंतर यशस्वीच्या खेळात, वर्तनात आमूलाग्र बदल झाला. त्याचा परिणाम त्याच्या करिअरमध्ये दिसला. ते वर्ष होतं २०२२. आयपीएल २०२२ मध्ये यशस्वीनं १० सामन्यांत २५.८० च्या सरासरीनं २५८ धावा केल्या होत्या. त्यानंतरच्या आयपीएलमध्ये यशस्वीच्या खेळात, वागणुकीत कमालीची सुधारणा दिसली. त्याची कामगिरी उत्तम झाली. १४ सामन्यांत त्यानं ६२५ धावा चोपल्या. त्याची सरासरी थेट ४८ वर पोहोचली. त्याचा स्ट्राईक रेट १६३.६१ होता.

आयपीएल २०२३ मध्ये केलेल्या शानदार कामगिरीचं फळ यशस्वीला मिळालं. १२ जुलै २०२३ रोजी तो वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. पहिल्याच कसोटीत त्यानं १७१ धावांची खेळी साकारली. त्याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. याच दौऱ्यात त्याला टी-२० मालिकेतही संधी मिळाली. अजिंक्य काढलेली खरडपट्टी यशस्वीसाठी टर्निंग पॉईंट ठरली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *