[ad_1]

कल्याण : कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड हे आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर राजकीय आरोप करायचे. अनेकदा गणपत गायकवाड आणि श्रीकांत शिंदे यांच्यात शाब्दिक वाकयुद्ध रंगायचं पण आता या राजकीय दुश्मनीने अगदी अंतिम टोक गाठलं आहे. त्याला कारण ठरलंय- शुक्रवारच्या रात्रीचा हिललाईन पोलीस स्टेशनमधला गोळीबार… जमिनीच्या वादातून आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहराध्यक्ष महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच पाच गोळ्या झाडल्या. यानंतर त्यांनी आपल्या कृत्याची कबुली देखील दिली. मला माझ्या कृत्याबद्दल कसलाच पश्चाताप होत नाही, असे सांगताना मला मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगार बनवलं आहे, जर मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेंच राहणार असतील तर राज्यात गुन्हेगारांचं राज्य येईल, असे गंभीर आरोप त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केले. यावेळी त्यांनी भाजपचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची नाराजी बोलून दाखवली.

आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात जमिनीवरून वाद सुरू आहे. हे प्रकरण शुक्रवारी उल्हासनगर हिललाइन पोलिस ठाण्यात पोहोचले. या वेळी पोलिस ठाण्यात गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या दालनात झालेल्या या गोळीबारात गायकवाड जखमी झाले असून, त्यांना ज्युपिटर या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांमधील गोळीबाराच्या या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. घटनेनंतर गणपत गायकवाड यांनी ‘झी २४ तास’ या वाहिनीशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले तर पक्षनेतृत्वाला अनेकदा सांगूनही त्यांनी यात लक्ष घातलं नाही, असं म्हणत फडणवीस यांच्याविषयी नाराजी बोलून दाखवली.

सविस्तर बातमी वाचा, नेमकं प्रकरण काय?

भाजप आमदाराने शिंदे गटाच्या नेत्यावर ५ गोळ्या झाडल्या, कशामुळे गुन्हा केला? मीडियाला सगळं प्रकरण सांगितलं

मुख्यमंत्र्यांनी मला गुन्हेगार बनवलं, तेच मुख्यमंत्री राहणार असतील तर गुन्हेगारच पैदा होतील : गणपत गायकवाड

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच पैदा होतील. आमच्या सारख्या साध्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी आज गुन्हेगार बनवलं आहे. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात गुन्हेगार पाळून ठेवले आहेत. त्यांनी दुसऱ्याचं आयुष्य खराब करायला घेतलेलं आहे. माझं राजकीय जीवन संपविण्याचा ते प्रयत्न करत आहेत, असे सनसनाटी आरोप करत भाजप नेतृत्वाने त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

दुसरीकडे माझ्या विकासनिधीतून झालेल्या कामांच्या ठिकाणी श्रीकांत शिंदे हे स्वत:चे बोर्ड लावतात. मी राजकारणातून संपावं, माझ्या राजकीय जीवनावर गंडातर यावं, म्हणूनच बापलेकाची जोडी मला विरोध करतात. पण माझं स्पष्ट म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करून भाजपशी हातमिळवणी केली आहे. जो माणूस उद्धव ठाकरे यांचा झाला नाही, तो भाजपचा काय होणार? भाजपबरोबर देखील असंच होईल. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाविषयी नेतृत्वाने विचार करावा. त्यांचा राजीनामा घेतला नाही तर महाराष्ट्रात गुंडाराज येईल, असे एकामागून एक सनसनाटी आरोप गणपत गायकवाड यांनी केले.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी

सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने कायदा हातात घेणं बरोबर नाही. आपण शिंदे गटाचे नेते महेश गायकवाज किंवा स्वत: मुख्यमंत्र्यांची तक्रार आपल्या पक्षनेतृत्वाच्या कानावर घातली होती का? असा प्रश्न पत्रकाराने विचारल्यावर गणपत गायकवाड म्हणाले, “मी अनेकदा देवेंद्र फडणवीस यांच्याशी या प्रकरणावर बोललो. परंतु माझ्या म्हणण्याची दखल घेतली गेली नाही” अशा शब्दात त्यांनी नाराजी बोलून दाखवली.

नेमकं प्रकरण काय?

भाजप आमदार गायकवाड आणि शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यात एका जमिनीच्या वादावरून सुंदोपसुंदी सुरू होती. दोघेही नेते शुक्रवारी रात्री हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात बसले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला असता आमदार गायकवाड यांनी महेश यांच्यावर ५ गोळ्या झाडल्याचे समजते. महेश यांच्या एका समर्थकालाही गोळी लागल्याने तो जखमी झाल्याची माहिती आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही या घटनेला दुजोरा दिलाय. महेश यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *