पावसाअभावी जिल्ह्यातील मुख्य भातपीक संकटात सापडले होते. भरडी जमिनीतील पिके अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली होती. काही भागांत तर करपा, कडीकरपाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांत चिंता होती. मात्र अखेर पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली त्यामुळे कोकणातला बळीराजा सुखावला आहे.
सिंधुदुर्गात पडत असलेल्या पावसाचा फटका राज्य महामार्गाला बसला आहे. फोंडा घाटात दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प झाली होती. फोंडा घाट मार्गे कोल्हापूरला जाणारी वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. ही दरड सकाळच्या सुमारास कोसळली त्यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाच्या वतीने दरड बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तरी या घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी माघारी फिरणे पसंत केले.
कोकणात गणेशोत्सव ९ दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोकणात सर्व मार्ग सुस्थितीत असणे आवश्यक आहेत. दरड पुन्हा कोसळली तर चाकरमान्यांच्या वाहतुकीवर परिणाम होऊ शकतात.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटामध्ये विशेष लक्ष देण्याची गरज आहे.घाटातून कोल्हापूरकडे अवजड वाहतूक मोठया प्रमाणावर असते.अवजड वाहने घाट चढत नसल्यामुळे घाटामध्ये बंद पडतात त्याची फटका छोट्या वाहन चालकांना सहन करावा लागतो.त्यामुळे गणेशोत्सव काळात अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करावी, अशी मागणी चार चाकी वाहन चालकांची आहे.
दरम्यान, कोकणासह राज्यातील विविध भागात पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अजून पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.