[ad_1]

बंगळुरू: तंत्रज्ञानाची माहिती अनेकदा आपल्या कामी येते. संपूर्ण जगच तंत्रज्ञानावर चालत असल्यानं त्याची माहिती असणं गरजेचं आहे. पण आपल्याकडे असलेल्या माहितीचा, तंत्रज्ञानाचा दुरुपयोग केल्यास जन्माची अद्दल घडू शकते. आंध्र प्रदेशच्या एका तरुणासोबत असाच प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे या तरुणानं अतिशय प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेतून (IIIT) पदवी घेतली आहे. बंगळरू पोलिसांच्या सायबर क्राईम विभागानं त्याला अटक केली.

२३ वर्षांच्या तरुणानं पैशांसाठी त्याच्या तांत्रिक ज्ञानाचा गैरवापर केला. त्यानं एक संकेतस्थळ हॅक करुन ४ कोटींपेक्षा अधिकचे रिवॉर्ड पॉईंट्स मिळवले. लक्ष्मीपती असं त्याचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. रिवॉर्ड ३६० नावाच्या संकेतस्थळाच्या व्यवस्थापनानं २४ जूनला सायबर फ्रॉडची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि लक्ष्मीपतीला अटक केली.

पोलिसांना लक्ष्मीपतीकडे घबाड सापडलं आहे. पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केलेल्या सामानाची किंमत ४.१६ कोटी रुपयांच्या घरात जाते. यामध्ये ५.२६९ किलो सोनं, २७.२५० किलो चांदी, ११.१३ लाखांची रोकड, विविध कंपन्यांच्या ७ दुचाकी, फ्लिपकार्ट वॉलेटमधील २६ लाख रुपये, ऍमेझॉन वॉलेटमधील ३.५० लाख रुपये, २ लॅपटॉप, ३ मोबाईलचा समावेश आहे.

ओंगोलमधील आयआयआयटीमधून लक्ष्मीपतीनं कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली आणि त्यानंतर बंगळुरुतील एका सॉफ्टवेअ कंपनीत काम सुरू केलं. डिसेंबर २०२२ मध्ये त्यानं नोकरी सोडली. त्यानंतर काही महिने दुबईत नोकरी केलं. मग तो बंगळुरूत परतला, अशी माहिती बंगळुरू शहर पोलीस आयुक्त बी. दयानंद यांनी दिली.

कॉलेजच्या दिवसांमध्ये शिकलेल्या हॅकिंगच्या आधारे रिवॉर्ड ३६० ला लक्ष्य केल्याची माहिती लक्ष्मीपतीनं पोलिसांना दिली. कंपनीची वेबसाईट हॅक करुन सहा महिने तो गिफ्ट व्हाऊचर आपल्या खात्यात पाठवत होता. त्यानंतर त्यानं खासगी बँका आणि कंपन्यांच्या ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या रिवॉर्ड पॉईंट्सचाही वापर सुरू केला. याचा वापर करुन त्यानं सोनं, चांदी, बाईक यासारख्या महागड्या वस्तू घेतल्या. दुबईला पळून जायचं आणि तिकडे सायबर सुरक्षा कंपनी उघडायची असा त्याचा प्लान होता.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *