[ad_1]

केप टाऊन : भारताच्या संघाने नेपाळवर दणदणीत विजय मिळवत १९ वर्षांखालील वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. या वर्ल्ड कपच्या सुपर सिक्स फेरीत भारताने यापूर्वी न्यूझीलंडला पराभूत केले होते. त्यानंतर शुक्रवारी नेपाळवर मोठा विजय मिळवत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार उदय शरण आणि सचिन धस यांनी दमदार शतके झळकावली. या दोघांच्या शतकांच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना २९७ धावांचा डोंगर उभारला होता. भारताच्या २९८ धावांचा पाठलाग करताना नेपाळचा डाव गडगडला आणि भारताने १३२ धावांनी विजय साकारला.भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली खरी, पण त्यांची चांगली सुरुवात झाली नाही. भारताला ठराविक फरकाने तीन धक्के बसले. त्यामुळे भारतीय संघ कठीण परिस्थितीत होता. पण यामधून भारतीय संघाला बाहेर काढले ते सचिन धस आणि कर्णधार उदय शरण यांनी. सचिनने यावेळी आक्रमक फलंदाजी केली आणि नेपाळच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. सचिनने यावेळी १०१ चेंडूंत ११ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर ११६ धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. सचिनला यावेळी उदयची चांगली साथ मिळाली. उदयने १०७ चेंडूंत ९ चौकारांच्या जोरावर १०० धावा केल्या. सचिन आणि उदय यांनी यावेळी चौथ्या विकेटसाठी तब्बल २१५ धावांची मॅरेथॉन भागीदारी रचली. या भागीदारीच्या जोरावरच भारताला या सामन्यात धावांच डोंगर उभारता आला. भारताने या दोघांच्या शतकांच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना २९७ धावांचा डोंगर उभारला. भारताच्या २९८ धावांचा पाठलाग करणाऱ्या नेपाळने संयमी सुरुवात केली. कारण १४ वे षटक सुरु असताना त्यांच्या ४८ धावा झाल्या होत्या. या १४ व्या षटकात त्यांना पहिला धक्का बसला. यानंतर नेपाळचे अन्य फलंदाजी धारातिर्थी पडायला लागले आणि एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. भारताच्या स्वामी पांडेने यावेळी चार बळी मिळवले. अर्शीन कुलकर्णीला फलंदाजीत आपली छाप पाडता आली नसली तरी दोन विकेट्स मिळवत त्याने भारताच्या विजयात आपला वाटा उचलला. भारतीय संघ आता वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचला आहे. सेमी फायनलमध्ये भारताला कोणाचा सामना करावा लागणार, याची उत्सुकता सर्वांना असेल. भारताने या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे चाहत्यांना या भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *