[ad_1]

अयोध्या: अयोध्येत नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिरामधील श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या विधींना मंगळवारपासून सुरुवात झाली. राम मंदिर न्यासाचे विश्वस्त व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते हे विधी सुरू झाले असून, देवदेवतांना आवाहन करण्यात येत आहे. या विधींच्या पूर्तीनंतर अयोध्येतील नवीन मंदिरात श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल.

अयोध्येमध्ये अनुष्ठानाला सुरुवात झाल्याची माहिती राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी सांगितले. न्यासाचे सदस्य अनिल मिश्रा आणि उषा मिश्रा हे प्राणप्रतिष्ठा विधीचे मुख्य यजमान आहेत. यजमान हे प्रामुख्याने पूजेचे विधी करतात. त्यामुळे मंगळवारपासून सुरू झालेल्या सर्व विधींना ते उपस्थित असतील आणि २२ जानेवारीच्या सोहळ्यातही ते पूजाअर्चना करतील. गृहस्थाश्रमातील व्यक्तीला पूजेचा अधिकार असतो का, या मुद्द्यावरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मिश्रा यांचा सहभाग महत्त्वाचा मानला जात आहे. २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाला आठ हजार निमंत्रित उपस्थित राहणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी संबोधित करणार आहेत.

१२१ आचार्यांच्या माध्यमातून विधींचे नियोजन करण्यात येत असून, गणेश्वरशास्त्री द्रविड हे अनुष्ठानाच्या सर्व विधींची देखरेख, समन्वय आणि मार्गदर्शन करत आहेत. काशीचे लक्ष्मीकांत दीक्षित प्रमुख पुजारी असतील. पुढील आठवडाभरात तीर्थपूजन, जल यात्रा आणि गंधाधिवास असे विधी होतील. सोमवारी प्रयासचित आणि कर्मकुटी पूजन झाले. प्राणप्रतिष्ठेचा मुख्य सोहळा २२ जानेवारीला दुपारी १२.२० वाजता सुरू होईल आणि दुपारी एक वाजता संपेल, असे मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले.

बालमूर्ती आणि देवत्वाचा भाव

म्हैसूरमधील अरुण योगीराज यांनी घडवलेल्या पाषाणाच्या राममूर्तीची अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेसाठी निवड झाल्यामुळे त्यांचे कुटुंबीय आनंदी झाले आहेत. ‘माझ्या मुलाने साकारलेल्या मूर्तीची निवड झाली, ही अत्यंत आनंदाची बाब आहे,’ अशा भावना त्यांच्या आईने व्यक्त केल्या. ‘अरुणने घडवलेल्या मूर्तीची निवड झाल्याची बातमी मिळाल्यापासून आम्ही खूप आनंदी आहोत. संपूर्ण कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरलेला नाही,’ असे त्यांनी नमूद केले. ‘लहान मुलांसारख्या चेहऱ्याबरोबरच देवत्वाचा भाव आणि पैलू डोळ्यासमोर ठेवून मी सहा-सात महिन्यांपूर्वी माझ्या कामाला सुरुवात केली. मी घडवलेल्या मूर्तीची निवड झाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. आता माझी मूर्ती रामभक्तांच्या पसंतीस उतरावी, अशी आस आहे,’ असे ते म्हणाले.

विविध वाद्यांचे वादन

अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिनी उत्तर प्रदेशच्या पखावाजापासून तमिळनाडूच्या मृदंगापर्यंत देशभरातील विविध शास्त्रीय वाद्यांचे वादन केले जाणार आहे. या वादनासाठी भारताच्या विविध भागांतील संगीतकारांची निवड करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातून बासरी आणि ढोल, कर्नाटकातून वीणा, महाराष्ट्रातून सुंदरी, पंजाबमधून अलगूज, मध्य प्रदेशातून संतूर, दिल्लीतून सनई, बिहारमधून पखवाज, ओडिशाचा मृदंग, मणिपूरहून पुंग, आसामचे नागडा आणि काली, छत्तीसगडचा तंबोरा, पश्चिम बंगालचे श्रीखोल आणि सरोद, आंध्र प्रदेशचे घाटम, झारखंडची सतार, तमिळनाडूचा नादस्वर आणि मृदंग, उत्तराखंडचे हुडका आणि राजस्थानमधील रावणहाट आदी वाद्यांचे वादन होणार आहे.

उदबत्तीचा दरवळ

श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महंत नृत्यगोपाल दास यांनी मंगळवारी गुजरातहून आणलेली १०८ फूट लांबीची उदबत्ती प्रज्ज्वलित केली. दास यांनी ‘जय श्रीराम’चा जयघोष करीत मोठ्या जनसमुदायाच्या साक्षीने ही उदबत्ती पेटवली. उदबत्तीचा सुगंध ५० किमी अंतरापर्यंत पोहोचेल, असा सांगण्यात आले. ३,६१० किलो वजनाच्या या उदबत्तीची रुंदी सुमारे साडेतीन फूट आहे. बडोद्याहून ती आणण्यात आली आहे.
राम मंदिरात म्हैसूरच्या शिल्पकारांनी घडवलेल्या रामलल्लाची पाषाणमूर्ती होणार विराजमान
Read Latest Maharashtra News And Marathi News

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *