[ad_1]

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शहरातील मिळकतधारकांकडे महापालिकेची ३४१ कोटींची थकबाकी असून, या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने आता पहिल्या टप्प्यात बड्या थकबाकीदारांना रडारवर घेतले आहे. करसवलत योजनेतून शंभर कोटी मिळाल्यानंतर आता पहिल्या टप्प्यात घरपट्टीची अडीच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या १,४२५ थकबाकीदारांना वसुलीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पाच लाख मिळकधारकांपैकी ३,२९३ थकबाकीदारांकडे १७० कोटींची थकबाकी आहे. पंधरा दिवसांत करभरणा न केल्यास थेट जप्ती वॉरंट बजावण्याचा इशारा दिला आहे. या वसुलीसाठी सप्टेंबरअखेरपर्यंतचा कालावधी महापालिकेकडून निश्चित करण्यात आला आहे.

३४१ कोटी थकीत

शहरातील मिळकत धारकांकडे तब्बल ३४१ कोटींची घरपट्टी थकीत आहे. यात १६२ कोटींच्या शास्तीच्या रकमेचा समावेश आहे. नियमित करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने करसवलत योजना राबविल्यानंतर आता थकबाकीदारांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. करसवलत योजनेमुळे महापालिकेच्या तिजोरीत तब्बल शंभर कोटी जमा झाले आहेत. नियमित करदात्यांना प्रोत्साहन योजनेअंतर्गत एप्रिलमध्ये आठ टक्के, मेमध्ये सहा टक्के तर जून महिन्यात घरपट्टीच्या देयकात तीन टक्के सवलत देण्यात आली होती. या योजनेचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर आता कर विभागाने थकबाकीदारांविरोधात कारवाई सुरू केली आहे.

या कारणामुळे वसुली मोहीम

पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे जानेवारी २०२४ पासून निवडणुकीची कामे लागणार असल्यामुळे महापालिकेने डिसेंबरपर्यंत वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे थकबाकी वसुली मोहीम ऑगस्टपासूनच सुरू करण्याचा निर्णय कर विभागाने घेतला आहे. यासाठी थकबाकीदारांच्या याद्या महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात घरपट्टीची अडीच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या १,४२५ थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांच्याकडील १७० कोटींच्या वसुलीसाठी सप्टेंबरअखेरपर्यंतचा कालावधी महापालिकेकडून निश्चित करण्यात आला आहे.

पंधरा दिवसांची मुदत

महापालिकेने थकबाकीदारांविरोधात कारवाईचा दंडुका उगारत नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. नोटिसा बजावतानाच थकबाकी भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे नोटिसांनंतर आता थकबाकीदारांना जाग आली आहे. एकूण १,४२५ बड्या थकबाकीदारांपैकी २३ थकबाकीदारांनी सव्वा कोटींची थकबाकी जमा केली आहे. पंधरा दिवसांत थकबाकी भरली नाही तर थेट मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजावून जप्तीची कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

– २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट होते २१० कोटी

– पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानासाठी महसूलवृद्धीच्याच अटीनंतर याच उद्दिष्टात २५० कोटींपर्यंत वाढ

असा आहे थकबाकीचा आकडा

११ थकबाकीदारांकडे प्रत्येकी एक कोटींपेक्षा अधिक घरपट्टी थकीत

४१ जणांकडे ५० लाखांपेक्षा अधिक घरपट्टी थकीत

२५० जणांकडे १० लाखांपेक्षा अधिक थकबाकी

३,२९३ जणांकडे एक लाखापेक्षा अधिक घरपट्टी थकीत

  • गोदा प्रदूषणमुक्तीकडे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोदावरी प्रदूषणाच्या मुद्द्यावर पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांकडून याचिका दाखल झाली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीसाठी विचार करण्यासाठी समितीचीही नेमणूक झाली. परंतु, पाणवेली या शब्दाचे मूळ आणि व्याप्ती शोधताना या वनस्पतीच्या उपयुक्ततेचा शोध ‘गुगल सर्च इंजिन’ द्वारे काही चांदोरी ग्रामपंचायतच्या टेक्नोसॅव्ही कर्मचाऱ्यांनी घेतला. यातून हाती आलेले निष्कर्ष ग्रामस्थांचा उत्साह वाढविणारे होते. या संदर्भांचा कर्मचाऱ्यांनी घेतलेला आधार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी याप्रश्नी साधलेल्या आश्वासक समन्वयामुळे आता चांदोरी परिसरातील सात गावांमधील सुमारे ४० महिलांचे हात पाणवेलींपासून हस्तकलेच्या वस्तू बनविण्यात गुंतले आहेत.

‘गोदेच्या नदीपात्रातील अतिक्रमणासह प्रदूषणाचा मुद्दाही तितकाच घातक आहे. या प्रदूषणामध्ये सांडपाण्याचाही भर मोठ्या प्रमाणावर जागोजागी दिसून येतो. या सांडपाण्यावर पोसल्या जाणाऱ्या पाणवेली गोदेच्या पाण्यासाठी अत्यंत घातक ठरतात. पाण्याचा प्रवाह अडवून धरण्यासह प्रदूषणयुक्त पाणीही पाणवेलींच्या परिसरात साचले जाऊन तेथील जैवविविधताही धोक्यात येते. यामुळे कोर्टाच्या आदेशान्वये नेमलेल्या समितीने याप्रश्नी विचार करताना पाणवेलींसंदर्भात इंटरनेटसारख्या स्रोतातून माहिती घेतली तेव्हा नावीन्यपूर्ण मुद्दे हाती आले. उपद्रवी मानल्या गेलेल्या पाणवेलींच्या योग्य वापरातून देश-विदेशातील शहरांमध्ये आकर्षक व आर्थिकदृष्ट्या उपयुक्त प्रकल्प उभे राहील्याची बाब आमच्या लक्षात आली’, अशी माहिती चांदोरीचे ग्रामसेवक सुरेश भामरे यांनी दिली.

येथील गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनातून जिल्हा परिषद प्रशासनाला सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणास सीईओ आशिमा मित्तल यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत नवजीवन फाउंडेशनशी बोलणी करीत खास गुवाहाटी येथील प्रशिक्षकांसह चांदोरीत सेटअप उभारला. येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच विजय खरात यांच्या पुढाकाराने चांदोरीसह परिसरातील चाटोरी, खेरवाडी, शिंगवे, गोंडेगाव, सायखेडा आणि करंजगाव या गावांमधील शिवणकाम आणि विणकामाची जाणीव असणाऱ्या ३७ महिलांची निवड पाणवेलींपासून हस्तकलेच्या वस्तू साकारण्यासाठी करण्यात आली.

…असा करता उपयोग

नदीपात्रातून पाणवेली आणून त्या सूर्यप्रकाशात सुकविल्यानंतर तळहाताएवढ्या यंत्राद्वारे पाणवेलींची वाळलेली मुळे सरळ करण्यात येतात. त्यानंतर त्यापासून ट्रे, पर्स, बसण्याचे आसन, फुलदाणी यांसारख्या वापराच्या व शोभेच्या वस्तू बनविण्यात येतात. याकामी नीवजीवन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रतीक कुंडू हे प्रशिक्षकांसह दहा दिवसांसाठी चांदोरी येथे मुक्कामी आहेत. हस्तकलेपाठोपाठ आगामी टप्प्यात या प्रकल्पांतर्गत पाणवेलींपासून बायोगॅस निर्मितीचाही प्रयोग चांदोरी ग्रामपंचायतीस साकारायचा आहे.

  • महासभेत तब्बल १४५ प्रस्ताव मंजूर

महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. १०) पार पडलेल्या पहिल्याच महासभेत विक्रमी अशा १४५ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. त्यात सर्वाधिक ३४ प्रस्ताव मलनिस्सारण विभागाचे असून, त्या पाठोपाठ रस्तेदुरुस्तीच्या विषयांचा समावेश आहे.

केंद्र शासनाच्या नॅशनल क्लीन एअर पॉलिसी (एन कॅप)अंतर्गत मिळालेला ४० कोटींच्या निधीतून सिटीलिंककरिता ५० इलेक्ट्रिक बस खरेदीच्या प्रस्तावाला महासभेत गुरुवारी मंजुरी देण्यात आली. पाठोपाठ स्वच्छ भारत अभियान-२ करिता सल्लागार नियुक्ती आणि मुख्यालयासह मनपाच्या इमारतींची देखभाल-दुरुस्तीलादेखील मंजुरी देण्यात आली. महापालिकेला गेले दोन महिने नियमित आयुक्त नसल्याने महासभा, तसेच स्थायी समितीच्या बैठकी होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे शहरातील विविध विकासकामांना मंजुरीचे विषय थांबले होते. डॉ. करंजकर यांची नियमित आयुक्त म्हणून महापालिकेत गेल्या महिन्यात नियुक्ती झाली. त्यानंतर शहरात प्रलंबित असलेल्या प्रस्तावांसाठी गुरुवारी महासभा पार पडली. त्यात विक्रमी असे १४५ प्रस्ताव ठेवण्यात आले होते. मलनिस्सारण, पाणीपुरवठा, बांधकाम, घनकचरा, सुरक्षा, उद्यानासह विविध विभागांतील प्रस्तावांचा समावेश होता. या प्रस्तावांमध्ये शहरात ५० इलेक्ट्रिकल बस खरेदीलाही मान्यता देण्यात आली. त्यासाठी ‘एन-कॅप’अंतर्गत मिळणारा ४० कोटींच्या अनुदानाचा निधी ठेकेदाकडे सुपूर्द केला जाणार आहे. त्याबदल्यात मनपाला ठेकेदाराला देय असलेल्या प्रतिकिलोमीटर दरात सूट मिळणार आहेत. २०२३-२४ या आर्थिक वर्षात २५, तर २०२४-२५ या वर्षात २५ अशा पद्धतीने ५० बस खरेदी केल्या जाणार आहेत. शासनाकडून प्रतिबस ५५ लाख रुपयांचे अनुदान मिळविण्यासाठी दोन पर्यायांचा वापर केला जात आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *