[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुण्यातील राज्यसभेचे खासदार प्रकाश जावडेकर आणि वंदना चव्हाण यांच्यासह राज्यातील सहा खासदारांची मुदत पूर्ण झाल्याने या जागांची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यात पुण्याला पुन्हा राज्यसभेत प्रतिनिधित्व मिळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यात पुण्यातील दोन जागांसह राज्यातील सहा जागांचा समावेश आहे. लोकसभेचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्यासह जावडेकर आणि चव्हाण असे तीन खासदार पुण्यातून होते. बापट यांचे निधन झाले, तर जावडेकर आणि चव्हाण यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. अशा परिस्थितीत राज्यसभेवर पुण्याला प्रतिनिधित्व न मिळाल्यास लोकसभा निवडणुकीपर्यंत पुण्याला एकही खासदार राहणार नाही. त्यामु‌ळे राजकीय पक्षांकडून उमेदवारी देताना पुण्याचा विचार व्हावा, अशी मागणी स्थानिक नेत्यांमधून होत आहे.

शिवसेना आमदार अनिल बाबर यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, एकनाथ शिंदेंना बंडावेळी दिलेली साथ

राज्यसभा निवडणुकीसाठी विधानसभेतील २८७ आमदार मतदान करणार असून, या वेळी विजयासाठी ४२ मतांचा ‘कोटा’ आवश्यक आहे. महाविकास आघाडीतून हा कोटा पूर्ण करण्यासाठी केवळ काँग्रेसकडे मते आहेत. त्यामुळे उर्वरित पाच जागा जिंकण्यासाठी ‘महायुती’ला संधी आहे. महायुतीकडून भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा आहे; शिवाय शिवसेनेकडून मिलिंद देवरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) कोणाला उमेदवारी दिली जाईल, याबाबत अद्याप स्पष्टता नसली, तरी यंदा अल्पसंख्याक समाजातील चेहऱ्याला संधी मिळेल, अशी चर्चा आहे.

पुण्याला प्रतिनिधित्व मिळावे

पुणे शहरातील दोन खासदार कमी होत असल्याने पुण्यातून एकाला तरी राज्यसभेवर संधी मिळावी, अशी स्थानिकांची मागणी आहे. भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक मते असल्याने भाजपकडून पुण्यातील उमेदवाराला संधी देण्याची क्षमता आहे. भाजपचे सुनील देवधर यांनी त्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली असली, तरी त्यांना अपेक्षित असा प्रतिसाद केंद्रीय नेतृत्वाकडून मिळत नसल्याची पक्षात कुजबूज आहे. ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी देवधर यांच्यासह विविध पर्यायांचा भाजपकडून विचार होऊ शकतो, अशीही प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली.

आघाडीच्या पदरात काय?

– महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने त्या दोन्ही पक्षांकडे खासदार निवडून आणण्यासाठी पुरेशी मते शिल्लक नाहीत.

– दोन्ही पक्षांमध्ये आमदारांनी कोणत्या पक्षादेशाचे (व्हिप) पालन करावे, हा मोठा प्रश्न आहे. अशा काळात काँग्रेस या जागेवर दावा सांगण्याच्या बेतात आहे.

– दुसरीकडे, निवडणूक बिनविरोध होण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आघाडीत गोंधळ उडवून देण्यासाठी भाजपकडून अतिरिक्त उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे.

पाण्याच्या टाकीवरुन पुण्यात भाजप-काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई; अजितदादा नव्हे तर भाजप आमदाराकडून उद्घाटन

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *