जोहान्सबर्ग: भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताला मोठा पराभव स्वीकारावा लागला. अंतिम सामन्यात भारतीय संघ नेहमीसारखा धाकड खेळताना दिसला नाही, पण संघाने प्रयत्न मात्र नक्कीच केला. ऑसी संघाने दिलेल्या २५४ धावांच्या लक्ष्यासमोर भारतीय संघ ४३.५ षटकात १७४ धावांवर ऑलआऊट झाला. टीम इंडियाकडून केवळ सलामीवीर फलंदाज आदर्श सिंग (४७) आणि आठव्या क्रमांकाचा फलंदाज मुरुगन अभिषेक (४२) काही योगदान देऊ शकले. इतर सर्व फलंदाजांसह भारताची मधली फळी सपशेल फेल ठरली. पण या सामन्यात भारताच्या पराभवाला ऑस्ट्रेलिया संघासह एक भारतीयसुध्दा तितकाच जबाबदार ठरला.

२०२४ च्या अंडर-१९ विश्वचषकातील भारतीय वंशाचा ऑस्ट्रेलियन खेळाडू म्हणजे हरजस सिंग. ६ सामने आणि फक्त ४९ धावा. एवढीच कामगिरी त्याच्या नावे होती. हरजस सिंग हा डावखुरा फलंदाज ऑस्ट्रेलियासाठी सातत्याने अपयशी ठरत होता, पण संघ व्यवस्थापनाचा त्याच्यावर अतूट विश्वास होता. खुद्द हरजसलाही फायनलसारख्या मोठ्या सामन्यात संधी मिळेल की नाही हे माहीत नव्हते, पण भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्धच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला नक्कीच संधी मिळाली.

हरजसनेही संघ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ करून दाखवत भारताविरुद्ध ५५ धावांची उत्कृष्ट खेळी केली. या खेळीत त्याने ३ षटकार आणि ३ चौकार लगावले. हरजसच्या या खेळीने संघाच्या पराभवाची स्क्रिप्ट लिहिली गेली. या सामन्यात हरजसने केवळ अर्धशतकच केले नाही तर एका टोकाकडून विकेट्स वाचवून संघासाठी उपयुक्त भागीदारीही केली.

हरजसच्या या अर्धशतकामुळेच ऑस्ट्रेलियन संघाला ५० षटकांत २५३ धावांपर्यंत मजल मारता आली. आयसीसी अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत एवढी मोठी धावसंख्या कोणीही करू शकले नाही. त्यामुळे या दबावाखाली टीम इंडिया विखुरली आणि एक भारतीयच त्यांच्या पराभवाचे कारण बनला.

कोण आहे हरजस सिंग?

हरजस सिंग याचा जन्म ३१ जानेवारी २००५ रोजी सिडनी येथे झाला. त्याच्या जन्मानंतर केवळ पाच वर्षांनी त्याचे वडील ऑस्ट्रेलियातून भारतात परतले. हरजसने वयाच्या ८ व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. हरजसचे वडील आणि आईही क्रिडा क्षेत्राशी संबिधित आहेत. हरजसने एका मुलाखतीत सांगितले की, त्याचे वडील राज्यस्तरीय बॉक्सिंग चॅम्पियन होते. तर आई राज्यस्तरीय लाँग जम्पर आहे. हरजसचे आई-वडील सध्या भारतात राहतात, पण तो स्वत: त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला पुढे नेण्यासाठी त्याच्या काकांसोबत ऑस्ट्रेलियात राहत आहे. हरजस शेवटचा २०१५ मध्ये भारतात आला होता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *