कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणूक लढण्यास माजी खासदार संभाजीराजे छत्रपती उत्सुक आहेत. राजेंनी स्वत: उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी कोल्हापूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर याचा विचार केला होता. अशात महाविकास आघाडीकडून कोल्हापूर मतदारसंघातून त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.

काँग्रेसकडून कोल्हापूरमधून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी मुंबईत काही नेत्यांशी चर्चा केली आणि पक्षात प्रवेश केल्यास उमेदवारी देण्याचा शब्द मिळाल्याचे वृत्त समोर आले होते. या वृत्तावर स्वत: संभाजीराजे यांनी खुलासा केला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे #स्वराज्य असेल या ध्येयाने माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे. ही पोस्ट शेअर करताना संभाजीराजेंनी #LokSabha2024 हा हॅशटॅग देखील वापरला आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज यांच्या नावाची चर्चा होती. पण त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने संभाजीराजेंच्या नावाची चर्चा सुरू झाली.

संभाजीराजे यांनी आपली भूमीका स्पष्ट केल्याने ते कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून,स्वत: स्थापन केलेल्या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातूनच ते आगामी लोकसभा निवडणुकीस सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. संभाजीराजे जरी स्वराज्य पक्षातच राहणार असले तरी, वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून स्वराज्य पक्ष मात्र महाविकास आघाडीचा घटक होऊ शकतो, हे त्यांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *