मुंबई : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांची मानसिक तपासणी करण्याची गरज आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. आपल्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का, असा प्रश्न विचारावासा वाटत आहे. कारण एक हत्या होत असताना त्याची बरोबरी श्वानासोबत केली जात आहे, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान साधलं.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

महाराष्ट्रात सरकारच्या आशिर्वादाने गुंडगिरी चालू आहे. हे सरकारमधील गँगवॉर आहे. गुंडांचे मंत्र्यांसोबतचे फोटो आणि त्यांना दिलं जाणारं संरक्षण हा चिंतेचा विषय आहे. आमचा कार्यकर्ता अभिषेक घोसाळकर याची हत्या झाली. ज्याने हत्या केली असं सांगितलं जातं, तो गुंड होता, नंतर त्याने आत्महत्या केली. सूडभावना टोकाची भावना असेल असं आपण मानू, पण त्याने आत्महत्या का केली? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

गणपत गायकवाड यांचा पोलीस स्टेशनमधील व्हिडिओ समोर आलाय, मॉरीस सोबतचा व्हिडिओ फेसबुक लाईव्हवर होता, पण अभिषेकला गोळ्या झाडताना दिसतंय पण कोणी गोळ्या घातल्या, याचा व्हिडिओ अजून समोर आलेला नाही. त्या मॉरीसने बॉडीगार्ड नेमला होता, अभिषेकवर गोळ्या कोणी चालवल्या, दोघांना मारण्याची सुपारी कोणी दिलेली का हा प्रश्न उपस्थित होतो, असंही ठाकरे म्हणाले.

आधीचे राज्यपाल कोश्यारी जास्तच कर्तव्यदक्ष होते, त्यांच्यासोबतच त्या गुंडाच्या (मॉरीस) सत्काराचा फोटो समोर आला आहे. गणपती विसर्जनावेळी एका आमदाराने गोळीबार केला, त्याला क्लीन चिट दिली. दहिसरजवळच्या आमदाराच्या मुलाने एका तरुणाचं अपहरण केलं होतं, ठाण्यात एका तरुणीच्या अंगावर गाडी घालणारा भाजप कार्यकर्ता होता, अशी उदाहरणंच ठाकरेंनी सांगितली.

काल पुण्यात पत्रकार निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे यांच्यावर हल्ला झाला. रश्मी शुक्ला यांचं जनतेला पत्र समोर आलंय, पोलीस प्रमुखांनी असं पत्र कुणाला लिहिलं नव्हतं. देवेंद्र फडणवीस यांना मी कलंक बोललो, फडतूस बोललो, पण आता माझ्याकडे शब्द उरले नाहीत. त्यांची मानसिक तपासणी करण्याची गरज आहे का असं वाटतं. महाराष्ट्राला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का असा प्रश्न निर्माण होत आहे. मुख्यमंत्री स्वतःच गुंडाला पोसत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की कुत्र्याचं पिल्लू… त्यांनी श्वान हा शब्द वापरला, पण संस्कृत शब्द वापरला म्हणजे सुसंस्कृत होत नाही. निर्ढावलेला, निर्दयी मनाचा गृहमंत्री मिळाला आहे. एक हत्या होत असताना बरोबरी श्वानासोबत करता? तुमच्या शेपट्या दिल्लीश्वरांसमोर हलवता, भाजपमे आओ सब भूल जाओ, अशी परिस्थिती आहे. पोलिसांना जर मोकळा हात दिला तर गुंडांचा खात्मा केला जाईल, असंही उद्धव म्हणाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *