नवी मुंबई: आईवडिलांच्या त्रासाला कंटाळून तसेच घरातील वातावरण आवडत नसल्याने तळोजा भागात राहणाऱ्या ५ ते १६ वर्षे वयोगटातील पाच मुली घर सोडून गेल्या होत्या. नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने या मुलींचा शोध घेऊन त्यांना दिल्लीतील गुडगाव येथून ताब्यात घेतले आहे. या पाचही मुलींचे अपहरण झाले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती.

तळोजा परिसरातून ५ ते १६ वर्षे वयोगटातील पाच मुली एका वेळेस बेपत्ता झाल्या होत्या. त्यांच्या पालकांनी सगळीकडे शोधाशोध केल्यानंतर तळोजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, गुन्हे शाखा युनिट-२ उमेश गवळी, युनिट-३चे पोलिस निरीक्षक मुलाणी तसेच इतर अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी तपास पथके तयार केली. या गुन्ह्यातील अपह्रत पाचही मुलींचा तांत्रिक तपासाद्वारे शोध घेण्यात येत होता. त्या पुराव्यांच्या आधारे पाच पैकी सोळा वर्षीय मुलगी गुडगांव येथे असल्याचे आढळले. तसेच त्या पाचही मुली एकमेकींच्या सोबत असल्याचेही स्पष्ट झाले होते. पोलिसांनी अपह्रत मुलींपैकी चौदा वर्षीय मुलीचा मानलेला भाऊ आरिफ याला संपर्क साधला. त्यानंतर पाचही मुलींना ताब्यात घेतले.

पोलिसांनी चारही मुलींना विश्वासात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांचे अपहरण झाले नसल्याचे तपासामध्ये आढळून आले. या पाच मुलींपैकी तिघी जणींनी आपण बहिणी, आईवडिलांच्या त्रासाला कंटाळून तसेच इतर दोघी बहिणी त्यांच्या घरातील वातावरण ठीक नसल्याने घर सोडून गेल्याचे सांगितले. या मुलींना पुढील कार्यवाहीसाठी तळोजा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

शिक्षणासाठी सोडले घर…

या प्रकरणातील १४ वर्षीय मुलीला तिचे आईवडील शाळा शिकू देत नव्हते. ते तिला जबरदस्तीने भाजीपाल्याचा व्यवसाय करण्यास भाग पाडत होते. तिने न ऐकल्यास तिला मारहाण करत होते. तिच्या दोन लहान बहिणींनाही शिकण्याची आवड असताना त्यांनाही शाळेत पाठवले जात नव्हते. त्यामुळे त्या १४ वर्षीय मुलीने मागील एक महिन्यापासून घर सोडून जाण्याची तयारी केली होती. त्यासाठी तिने पैसे जमवले होते. तिला सात बहिणी असून त्यापैकी ७ व ५ वर्षीय बहिणींना घेवून ती घरातून बाहेर पडली होती.

तळोजा, खारघर, वांद्रे ते गुडगाव प्रवास

या तिघी बहिणी घर सोडून असताना त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या १६ व १४ वर्षे वयोगटातील दोघी बहिणी त्यांना भेटल्या. त्यांना त्या तिघी घर सोडून जात असल्याचे सांगितले. त्या दोघींनी त्यांच्या घरातील वातावरण चांगले नसल्याने त्यांच्या सोबत घर सोडून जायचे ठरवले. या पाचही मुलींनी सकाळी तळोजा येथून रिक्षाने खारघर रेल्वे स्टेशन गाठले. त्यांनतर त्यांनी वांद्रे रेल्वे स्टेशन गाठून तेथून रेल्वेने दिल्ली येथे गेल्या. त्यानंतर दिल्लीतील गुडगांव येथे राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीच्या मानलेला भावाकडे गेल्या होत्या.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *