भारताच्या या लढतीचा गुणतक्त्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याने संघात मोठे बदल केले जाऊ शकतात अशी चर्चा आहे. औपचारिक या लढतीसाठी भारत स्टार खेळाडूंना विश्रांती देऊ शकतो ज्यात विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि अन्य काही सीनिअर खेळाडूंचा समावेश असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मॅचच्या आधी संघातील बदलाबद्दल प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मोठी अपडेट दिले आहेत.
संघातील सिनिअर खेळाडूंना विश्रांती देण्याबद्दल बोलताना राहुल द्रविड म्हणाले, या सामन्याच्या आधी पुरेशी विश्रांती मिळाली आहे. सेमीफायनल लढतीच्या आधी सरावासाठी ही लढत चांगली ठरू शकते. द्रविड यांच्या या वक्तव्यावरून भारतीय संघात बदल होण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
भारतीय संघाने वर्ल्डकपमधील अखेरची लढत ५ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळली होती. सर्व खेळाडूंना एक आठवडा आराम मिळाला आहे. नेदरलँड्सविरुद्ध काही खेळाडूंना विश्रांती दिली तर त्यांची लय बिघडण्याची शक्यता आहे. अशात द्रविड कोणत्याही खेळाडूला विश्रांती देऊन त्याची लय तोडणार नाहीत.
अखेरच्या मॅचनंतर आतापर्यंत ६ दिवसांचा ब्रेक मिळाला आहे. सर्व खेळाडू चांगल्या मानसिकतेत आहेत आणि मॅच खेळण्यास तयार आहेत. सेमीफायनलच्या मॅचच्या आधी फक्त एक लढत आहे आणि आम्ही पूर्ण तयारी केली आहे. वर्ल्डकप अखेरच्या टप्प्यात आहे आणि आमचा फोकस हा बेस्ट खेळाडू अंतिम ११ मध्ये ठेवण्याचा आहे. ही गोष्ट फक्त मानसिक नाही तर शारीरिक दृष्ट्या मदत करेल. ज्यामुळे सेमीफायनल आणि फायनलसाठी आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करण्यास मदत करेल. आशा आहे की आम्ही फायनल खेळणार आहोत, असे देखील द्रविड यांनी सांगितले.
Read Latest Sports News And Marathi News