[ad_1]

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत चोरीची एक विचित्र घटना घडली आहे. एका मुलीनं स्वत:च्या आईच्या घरातच चोरी केली. पश्चिम दिल्लीच्या उत्तर नगरमध्ये ही घटना घडली. आरोपी तरुणी ३१ वर्षांची आहे. ती बुरखा परिधान करुन तिच्या आईच्या घरात शिरली आणि तिनं लाखो रुपयांचे दागिने, रोकड लंपास केली. घरात चोरी झाल्याची तक्रार कमलेश नावाच्या महिलेनं ३० जानेवारीला पोलिसांकडे केली. कमलेश उत्तम नगरातल्या सेवक पार्कात राहतात. ३० जानेवारीला दुपारी २ ते २.३० च्या दरम्यान घरात चोरी झाली. लाखो रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने आणि २५ हजार रुपये चोरीला गेले, अशी माहिती कमलेश यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तपास सुरू केला. घरात कोणीही जबरदस्तीनं घुसत असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले नाहीत. घराचा मुख्य दरवाजा आणि कपाटाला असलेली कुलूपही सुस्थितीत होती. ती फोडण्यात आलेली नव्हती. पोलिसांनी परिसरात असलेले सीसीटीव्ही तपासले. फुटेजमध्ये एक तरुणी घरात शिरताना दिसली. यानंतर पोलिसांनी कमलेश यांची ३१ वर्षीय कन्या श्वेताला अटक केली. पोलिसांनी तिची चौकशी केली. त्यात तिनं गुन्ह्याची कबुली दिली. माझी आई लहान बहिणीवर अधिक प्रेम करते. मला सापत्नपणाची वागणूक देते. त्यामुळे घरात चोरी केल्याचं श्वेतानं पोलिसांना सांगितलं. द्वेष भावनेतून श्वेतानं केली. याशिवाय तिच्या डोक्यावर कर्जदेखील होतं. डोक्यावर असलेलं कर्जाचं ओझं कमी करण्यासाठी चोरीची योजना आखल्याचं श्वेतानं पोलिसांना सांगितलं. चोरलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने माझे होते. ते मी आईकडे ठेवायला दिले होते. तर बाकीचे दागिने आईनं बहिणीच्या लग्नासाठी बनवून घेतले होते, अशी माहिती श्वेतानं पोलिसांना दिली. श्वेता जानेवारीत तिच्या आईच्या घरातून बाहेर पडली. काही दिवस कमलेशनं तिच्या मोठ्या लेकीला स्थिरस्थावर होण्यास मदत केली. धाकटी लेक कामावर गेल्यावर आई श्वेताच्या घरी जायची. याचा फायदा श्वेतानं घेतला. चोरीच्या दिवशी श्वेतानं सर्वप्रथम आईच्या घराच्या चाव्या लांबवल्या. त्यानंतर भाजी खरेदी करण्याच्या बहाण्यानं स्वत:च्या नव्या घरातून बाहेर पडली.घरातून निघालेली श्वेता बुरखा परिधान करण्यासाठी सार्वजनिक शौचालयात गेली. त्यानंतर ती आईच्या घरात पोहोचली. तिनं चाव्यांनी मुख्य दरवाजा उघडला. त्यानंतर कपाटातील तिजोरी उघडून त्यातील दागिने आणि रोकड घेऊन पोबारा केला. घरात चोरी झाल्याचं कमलेश यांनी श्वेताला सांगितलं. त्यावर श्वेतानं तिला त्रास झाल्याचं नाटक केलं. आपल्यावर कोणीही संशय घेणार नसल्याचा तिचा अंदाज होता. पण तो फोल ठरला. दागिने विकल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं. पण पोलिसांनी ते तिच्याकडून हस्तगत केले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *