[ad_1]

पाकिस्तानात आघाड्यांचा ‘हंगाम’

पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल समोर आले असून, त्यामध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी लक्षणीय यश मिळवले आहे; मात्र पीएमएल (नवाझ) आणि पीपीपी अन्य छोट्या पक्षांच्या साथीने सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे, पाकिस्तानसाठी आघाडी सरकारांचा काळ सुरू झाला आहे.

इम्रान खान यांची मुसंडी
पाकिस्तानात झालेल्या निवडणुकीत इम्रान खान यांचा ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ने (पीटीआय) मुसंडी मारली आहे. इम्रान खान तुरुंगात असून, त्यांच्या पक्षावरही बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतरही ‘पीटीआय’ने समर्थन दिलेल्या अपक्षांनी या निवडणुकीत मुसंडी मारली आहे. त्या तुलनेत, काही वर्षांपूर्वीपर्यंत पाकिस्तानच्या राजकारणावर वर्चस्व असणाऱ्या शरीफ आणि भुट्टो कुटुंबीयांच्या पीएमएल (नवाझ) आणि पाकिस्तान पीपल्स पक्षाला (पीपीपी) मर्यादित यश मिळाले आहे. आता या पक्षांना एकत्रित येऊन पुन्हा सरकार स्थापन करावे लागणार आहे. त्यासाठी त्यांच्यामध्ये होणाऱ्या वाटाघाटीमध्ये आणि लष्कराच्या पाठिंब्यावरच सरकारचे स्थैर्य अवलंबून आहे.

पक्षीय बलाबल

एकूण जागा ३३६

निवडणूक झालेल्या जागा २६६
‘पीटीआय’पुरस्कृत अपक्ष १०१
पीएमएल (नवाझ) ७३
पीपीपी ५४
एमक्यूएम १७
अन्य छोटे पक्ष ११
निकाल बाकी १०
नॅशनल असेंब्लीमध्ये बहुमतासाठी आवश्यक जागा-१६९

शरीफ बंधू सक्रिय
– माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी विजयाचा दावा करताना, छोट्या पक्षांबरोबरच अपक्षांशी हातमिळवणी करण्याचे संकेत दिले आहेत.
– ‘पीपीपी’कडूनही सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
– ‘पीपीपी’चे बिलावल भुट्टो आणि त्यांचे वडील असिफ अली झरदारी यांनी नवाझ शरीफ व शाहबाझ शरीफ यांच्याशी स्वतंत्र बैठका घेतल्या आहेत.
– शाहबाझ शरीफ यांनी ‘जमियत उलेमा-ए-इस्लाम’चे (एफ) प्रमुख मौलाना फजलूर रेहमान आणि ‘एमक्यूएम’चे नेते मकबूल सिद्दिकी यांच्याबरोबर दूरध्वनीवरून चर्चा केली आहे.

पंतप्रधानपदाच्या नावावरून पेच
पीएमएल (नवाझ) आणि ‘पीपीपी’ एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकतात; मात्र पंतप्रधान कोण असेल, यावर दोन्ही बाजूंकडून रस्सीखेच असल्याचे सांगण्यात येते. शरीफ यांना पंतप्रधान म्हणून स्वीकारणार नाही, असे ‘पीपीपी’चे वरिष्ठ नेते खुर्शिद शाह यांनी सांगितले. त्यांनी बिलावर भुट्टो यांचे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे केले आहे. या परिस्थितीमध्ये सर्वमान्य नाव म्हणून शाहबाझ शरीफ यांची निवड होऊ शकते. लष्कराकडूनही त्यांना पाठिंबा मिळेल, अशी चर्चा आहे.

गैरप्रकारांचा ‘पीटीआय’चा आरोप
‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’द्वारा इम्रान खान यांचा संदेश प्रसारित झाला असून, त्यामध्ये त्यांनी विजयाचा दावा केला आहे. दरम्यान, निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. भविष्यातील निर्णयासाठी चर्चा सुरू आहे. विजयी उमेदवारांपैकी अनेक जण तुरुंगात आहेत, काही जण भूमिगत आहे. त्यामुळे थेट चर्चा शक्य नसल्याचे ‘पीटीआय’चे माहिती सचिव रऊफ हसन यांनी सांगितले. तसेच, पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतामध्ये ‘पीटीआय’ची राजकीय ताकद दिसून आली आहे. मात्र, निकालात फेरफार करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप त्यांनी केला.

राखीव जागांकडे लक्ष
नॅशनल असेंब्लीमध्ये ७० जागा महिला आणि गैरमुस्लिम अल्पसंख्याक समुदायांसाठी राखीव आहेत. सभागृहातील सदस्यसंख्येच्या प्रमाणात या जागा राजकीय पक्षांना देण्यात येतात. ‘पीटीआय’ पुरस्कृत अपक्षांची संख्या सर्वाधिक असली, तरीही अपक्ष म्हणून त्यांना राखीव जागांमध्ये हिस्सा बसणार नाही. त्यामुळे, या ७० जागांमध्ये जास्तीत जास्त वाटा मिळेल, यावर पीएमएल (नवाझ) आणि ‘पीपीपी’ची मदार आहे. या जागांच्या संख्येनुसार, त्यांच्या सदस्यसंख्येमध्ये वाढ होईल आणि त्याचा फायदा त्यांना नव्या सरकारच्या स्थापनेवेळी होईल.

‘पीटीआय’ व अपक्षांसमोर पेच
‘पीटीआय’वर बंदी घालण्यात आल्यामुळे, या पक्षाने पुरस्कृत केलेले अपक्ष या निवडणुकीत उभे होते. मात्र, हे उमेदवार पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवले नव्हते. त्यामुळे, या विजयी उमेदवारांना तीन दिवसांमध्ये त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. त्यामध्ये एखाद्या राजकीय पक्षात सहभागी होणे, अपक्ष म्हणून कायम राहणे आणि स्वतंत्र गटाची स्थापना करणे असे तीन पर्याय त्यांच्यासमोर आहेत. निवडणून आलेले बहुतांश सदस्य इम्रान खान यांच्याशी निष्ठावान राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतरही अन्य पक्षांकडून अपक्ष फोडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *