[ad_1]

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे असतानाही नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यंदिनी, दि. १५ ऑगस्ट रोजी शासकीय ध्वजवंदन करण्याचा मान ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना मिळाला आहे. त्यामुळे पालकमंत्रिपद बदलाच्या चर्चेला पुन्हा ऊत आला आहे.

शिंदे-फडण‌वीस सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची ‘एंट्री’ झाल्यानंतर, तसेच भुसेंना वजनदार खाते मिळाल्यानंतर नाशिकचे पालकमंत्रिपद बदलले जाणार, अशी चर्चा सुरू असतानाच महाजन यांना ध्वजवंदनाचा मान मिळाल्याने पालकमंत्रिपद बदलाची चर्चा पुन्हा रंगली आहे. भुसे यांना धुळे, तर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना अमरावती जिल्हा मुख्यालयात ध्वजवंदन करण्याचा मान मिळाला आहे. महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर वर्षभरापूर्वी सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करीत नऊ आमदारांसह राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनून सहभागी झाले. त्यात नाशिकमधून छगन भुजबळ यांचाही समावेश झाल्याने नाशिकचे पालकमंत्रिपद बदलाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

काँग्रेसमुळेच शरद पवार यांचे पंतप्रधानपद हुकलं, मोदींच्या विधानाला अजितदादांचा दुजोरा

नाशिक जिल्ह्यात भाजपची ताकद असतानाही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पालकमंत्रिपद शिंदे गटाकडे गेले होते. त्यावरून भाजपमध्येही नाराजी होती. त्यात नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात दादा भुसे यांच्याकडील बंदरे विकास व खनिकर्म असे दुय्यम दर्जाचे खाते काढून घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकामसारखे वजनदार खाते दिले होते. त्यामुळे नाशिकचे पालकमंत्रिपद छगन भुजबळ यांना मिळणार अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु, शिंदे गटाने ही चर्चा फेटाळून लावली होती. परंतु, गुरुवारी राज्य सरकारने स्वांतत्र्य दिनानिमित्त जिल्हा मुख्यालयात ध्वजवंदन करणाऱ्या मंत्र्यांची नावे जाहीर केली. त्यात नाशिक मुख्यालयात ध्वजवंदन करण्याचा मान पालकमंत्री भुसेंऐवजी गिरीश महाजन यांना देण्यात आला आहे. पालकमंत्री भुसे असताना महाजन यांना ध्वजवंदनाचा मान दिल्याने पालकमंत्रिपद बदलाच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. शिंदे गटाने मात्र हा आदेश ध्वजवंदनापुरताच मर्यादित असल्याचा दावा केला आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी भांडणात भाजपचा लाभ?

नाशिकचे पालकमंत्री असतानाही दादा भुसे यांना ध्वजवंदनासाठी धुळे जिल्हा देण्यात आला आहे. छगन भुजबळ यांना थेट अमरावती जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या संघर्षात आता नाशिकचे पालकमंत्रिपद पुन्हा भाजपकडे येणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांच्या ‘एंट्री’मुळे आधीच शिंदे गट अस्वस्थ आहे. त्यात पुन्हा पालकमंत्रिपदावरून फेरबदल झाल्यास भाजप आणि शिंदे गटाचे संबंध ताणले जाण्याची चिन्हे आहेत.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *