रत्नागिरी : काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते अशोकराव चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने आता त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित मानलं जात आहे. अशोकराव चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर कोकणात फारशी चांगली स्थिती नसलेल्या काँग्रेसमध्ये कोणताही फार मोठा परिणाम झाला, तरीही आता विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पुन्हा राज्यसभेवर न पाठवता त्यांना कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची रणनीती भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर आखण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे आता दस्तूरखुद्द एनटीआर म्हणजेच नारायण राणे यांना उमेदवारी मिळाल्यास महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होईल आणि याचा मोठा फायदा या निवडणुकीत होईल.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे विनायक राऊत हे पुन्हा यंदा उमेदवार असतील त्यांच्यासमोर तुल्यबळ उमेदवार असावा यासाठी भाजपाने थेट नारायण राणे यांच्यासारखे अभ्यासू व आक्रमक नेत्याला या लोकसभा मतदारसंघात उतरवण्याची तयारी भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून सुरू आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल व केंद्रीय मंत्री नारायण राणे या दोन्ही नेत्यांना आता लोकसभा निवडणुकीत उतरवण्याची तयारी भाजपकडून करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. यामध्ये भागवत कराड यांचाही समावेश आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांना उमेदवारी मिळाल्यास ही लढत तुल्यबळ होईल तसेच नारायण राणे यांचा कोकणातील संपर्क, कोकणातील अभ्यास, नारायण राणे यांचे कोकणातील अनेक नेत्यांशी असलेले घनिष्ठ संबंध या सगळ्याचा मोठा उपयोग या लोकसभा निवडणुकीत भाजपला होऊ शकतो. यापूर्वी २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ सुपुत्र निलेश राणे हे या मतदारसंघातून खासदार राहिले आहेत. त्यानंतर निलेश राणे यांचा दोन वेळा या मतदारसंघातून पराभव झाल्यानंतरही त्यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील संपर्क कायम राहिला आहे.

राज्यसभेच्या ६ जागांसाठी २७ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. राज्यसभेतून आता पियुष गोयल व नारायण राणे हे दोघेही निवृत्त झाल्याने आता या दोघांनाही लोकसभेच्या रणांगणात उतरवले जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता महायुतीकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवार कोण यासाठी असलेले अन्य नावांची चर्चा आता मागे पडली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे विनायक राऊत व महायुतीकडून एनटीआर म्हणजेच नारायण तातू राणे अशी लढत होईल हे जवळपास निश्चित आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *