मुंबई: राज्यातील सर्व माध्यमांच्या पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग आता सकाळी ९ किंवा ९ नंतर भरविण्यात येणार आहे. याबाबतचे परिपत्रक राज्य सरकारने गुरुवारी काढले आहे. हा बदल राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना लागू असेल. सध्या राज्यातील अनेक ठिकाणी हे वर्ग सकाळी सात वाजता भरविण्यात येत असून यामुळे मुलांना लवकर उठावे लागते आणि त्याचा त्रास लक्षात घेऊन राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यपाल रमेश बैस यांनी एका कार्यक्रमात हा मुद्दा उपस्थित केला होता. पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतची मुले लहान असतात. त्यांचे वर्ग सकाळी ७ वाजता असल्याने लवकर उठावे लागते. यामुळे अनेकदा त्यांची झोप पूर्ण होत नाही आणि त्याचा मुलांना त्रास होतो. या मुलांच्या शाळांची वेळ बदलावी अशी सूचना राज्यपालांनी केली होती. या सूचनेनंतर शालेय शिक्षण विभागाने याचा अभ्यास केला. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने शाळांच्या वेळात बदल करण्यासंदर्भात अभ्यास केला. यावर शिक्षणतज्ञ, पालक, प्रशासनातील अधिकारी यांचे मत मागवण्यात आले होते. हा निर्णय घेताना सरकारी तसेच निमसरकारी कार्यालांच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाहीत याची काळजी घेण्याची सूचना केली आहे.

वेळ बदलण्याचे कारण

बदललेली जीवनशैली, मनोरंजनाची विविध साधने, ध्वनीप्रदूषण अशा अनेक कारणांमुळे शहरात मुले रात्री उशीरा झोपतात. सकाळी सातची शाळा असेल तर त्यांना लवकर उठावे लागते. यामुळे त्यांची झोप नीट होत नाही. मुले सकाळी लवकर उठण्यास कंटाळा करतात. शाळेत जाण्यासाठी पालक मुलांना सकाळी लवकर उठवतात. पण यामुळे मुलांमध्ये दिवसभर आळस राहतो. त्याचा परिणाम त्यांच्या शरिरावर आणि मानसिकतेवर देखील होतो. यामुळे राज्यपालांनी शाळांची वेळ बदलण्याची सूचना केली होती.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *