म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: बँकेतर्फे देण्यात येणाऱ्या कॅपिटल वर्किंग लोनवर शासनास भरण्यासाठी ग्राहकांकडून स्टॅम्प ड्युटी आकारली जाते. कोटक महिंद्रा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांकडून स्टॅम्प ड्युटीसाठी घेतलेली रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा न करता त्याचा स्वतःसाठी वापर केला. कर्जाच्या अडीचशेहून अधिक प्रकरणात जवळपास एक कोटी दोन लाख रुपयांच्या रकमेवर बँक कर्मचाऱ्यांनी डल्ला मारला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँक व्यवस्थापकाने केलेल्या तक्रारीवरून दहा कर्मचाऱ्यांविरुद्ध वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोटक महिंद्रा बँक (वर्किंग कॅपिटल) या बँकेमार्फत ग्राहकांना आवश्यकतेप्रमाणे लहान-मोठ्या उद्योगधंद्यांसाठी कर्ज दिले जाते. सांताक्रूझ पूर्वेकडील वाकोला येथील शाखेतून अशी कर्जे वितरित केली जातात. ग्राहकांना कर्ज देताना त्यांची उत्पन्नाची साधने, स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता, स्थावर मालमत्तेचे मूल्यांकन करून, त्या आधारे कर्जाची रक्कम ठरवली जाते. योग्य पडताळणीनंतर कर्ज मंजूर झाल्यास ग्राहकांकडून शासनाची स्टॅम्प ड्युटी, प्रोसेसिंग फी आणि इतर फी भरून घेण्यात येते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांना कर्ज वितरित केले जाते. अर्ज केल्यापासून ते रक्कम वितरित करण्यापर्यंत बँकेचे अनेक विभाग यामध्ये काम करतात. एप्रिल २०२२ ते जून २०२३ या कालावधीत २४६ जणांना कर्ज मंजूर करण्यात आले होते. यातील एका प्रकरणात शासनाला भरण्याची स्टॅम्प ड्युटीची रक्कम बँक कर्मचाऱ्याने ग्राहकाकडून स्वतःच्या खात्यावर घेतल्याचे दिसून आले.

शासकीय रक्कम अशाप्रकारे वैयक्तिक खात्यावर घेण्यात आल्याने याची गंभीर दखल बँक व्यवस्थापनाने घेतली. सर्वच्या सर्व २४६ प्रकरणांची विभागीय चौकशी करण्यात आली. या विभागीय चौकशीमध्ये या सर्वच प्रकरणांमध्ये बँक कर्मचाऱ्यांनी शासनाला भरण्यासाठीची रक्कम स्वतःच्या खात्यावर घेतली, मात्र ती शासकीय तिजोरीत भरली नसल्याचे समोर आले. विशेष म्हणजे कर्जाच्या फाइलवर त्यांनी स्टॅम्प ड्युटी भरल्याची बनावट पावती लावल्याचे आढळले. यामध्ये बँकेतील दहा कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळला. या कर्मचाऱ्यांचे बँक तपशील तपासले असता एकूण एक कोटी दोन लाख रुपये हडप केल्याचे दिसून आले. कर्मचाऱ्यांकडून याबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने बँक व्यवस्थापकाने याबाबत पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार वाकोला पोलिसांनी दहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *