म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यातील अनेक जिल्हे एकमेकांना जोडणारे एक्स्प्रेस-वे, कॉरिडॉर करताना राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर ते गोवा हा धार्मिक स्थळांना जोडणारा ‘शक्तिपीठ महामार्ग’ साकारण्याची योजना आखली आहे. हा महामार्ग ११ जिल्ह्यांतून जात आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याच्या पर्यटनासह औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे; तसेच रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.

प्रवासाचे अंतर कमी
महामार्गातील प्रवासाचे अंतर २१ तासांवरून सुमारे आठ ते दहा तासांनी कमी होईल. सुमारे ८० हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. सुमारे आठशे किलोमीटर लांबीचा राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग ठरणार आहे. नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गामुळे विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ जोडले जाईल. मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, बीड, परभणी, धाराशिव आणि लातूर या सहा जिल्ह्यांना जोडला जाणार आहे; तसेच सोलापूर, सांगलीसह कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिराचे दर्शन घडणार आहे. महामार्गात सिंधुदुर्गापर्यंत ११ जिल्हे एकमेकांना जोडले जाणार आहेत,’ अशी रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘मटा’ला दिली.

तीर्थक्षेत्रांचे पर्यटन वाढणार
– नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यातील महालक्ष्मी, तुळजाभवानी, पत्रादेवी यासारखी तीन शक्तिपीठे जोडली जातील.
– महामार्गावर औंढा नागनाथ, परळी वैजनाथ येथील दोन ज्योतिर्लिंगे जोडली जातील. त्याशिवाय पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन या वेळी घडू शकणार आहे.
– कारंजा, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी ही दत्ततीर्थक्षेत्रे स्थळे जोडली जातील.
– तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी या देवींचे दर्शन घडणार आहे.
– हा महामार्ग येत्या चार ते पाच वर्षांत पूर्णत्वास जाईल.
पुणे-नाशिक आता फक्त ३ तासात! औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या अंतिम आखणीस मान्यता

महामार्गाचा फायदा काय?
-विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातील धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या पर्यटनाला चालना
-नागपूर ते गोवा हा मार्ग जोडला जाईल
-या शहरांमधील आयात, निर्यात व्यापार वाढण्यास मदत होणार
-नागपूर ते गोवा प्रवासाला २१ तास लागतात. सुमारे आठ ते दहा तासापर्यंत प्रवास कमी होईल
-औद्योगिक, कृषी, पर्यटन; तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार
-बांधकाम व्यवसायाला गती मिळेल.
-विविध उद्योगाच्या संधी, औद्योगिक कंपन्यांचा विस्तार होईल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *