लंडन: भारतीय आयटी कंपनी इन्फोसिसमुळे ब्रिटनमध्ये वाद निर्माण झाला आहे. विरोधी बाकांवरील मजूर पक्षाच्या आरोपांमुळे पंतप्रधान अडचणीत सापडले आहेत. ब्रिटनमध्ये इन्फोसिसला व्हिआयपी ऍक्सेस मिळाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सुनक यांचे सासरे नारायण मूर्ती इन्फोसिसचे सहसंस्थापक आहेत. सुनक यांच्या पत्नीकडे इन्फोसिसचे शेअर्स आहेत. त्यामुळेच इन्फोसिसला ब्रिटनमध्ये झुकतं माप देण्यात आल्याचा आरोप आहे.माध्यमातील एका बातमीवरुन विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. ब्रिटनमधील साप्ताहिक ‘संडे मिरर’नं एक वृत्त प्रसिद्ध केलं आहे. त्यात ब्रिटिश मंत्र्यांचा बंगळुरु दौऱ्याचा उल्लेख आहे. ब्रिटनचे व्यापारमंत्री लॉर्ड डॉमिनिक जॉन्सन गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात बंगळुरुला गेले होते. तिथे असलेल्या इन्फोसिसच्या कार्यालयातील बैठकीत त्यांनी सहभाग घेतला. यावेळी डॉमिनिक यांनी ब्रिटनमध्ये इन्फोसिसच्या विस्तारावर चर्चा केल्याची माहिती वृत्तात आहे.इन्फोसिसनं ब्रिटनमध्ये विस्तार करायला हवा. त्यासाठी मी तुम्हाला हरतऱ्हेची मदत करेन आणि त्यात मला आनंदच होईल, असं लॉर्ड जॉन्सन यांनी इन्फोसिसच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत म्हटल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे. या प्रकरणावरुन विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सुनक यांच्या अतिशय जवळच्या कंपनीला व्हिआयपी ऍक्सेस का देण्यात आला? हा विषय अतिशय गंभीर आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षातील नेते जोनाथन एशवर्थ यांनी दिली.लॉर्ड जॉन्सन यांनी बंगळुरुत इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांना पर्सनल व्हिसा स्किमची माहिती दिली. यामुळे इन्फोसिससारख्या बहुराष्ट्रीय कंपनीला खूप फायदा होईल, असं जॉन्सन यांनी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. याबद्दल सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. व्यापार मंत्री ब्रिटनमध्ये गुंतवणूक आणण्याच्या हेतूनं इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांना भेटले. ते सातत्यानं आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि रोजगार निर्माण करण्यासाठी भेटी घेतल्या जातात, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *