म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: हे बदलत्या भारताचे चित्र असून मी इथे प्रेमाचा संदेश घेऊन आलो आहे, असे सांगून अयोध्येत २२ जानेवारीला झालेल्या श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहणारे दिल्लीचे इमाम अहमद इलियासी यांच्याविरोधात फतवा जारी करण्यात आला आहे. ‘मी कोणताही गुन्हा केलेला नाही आणि निनावी फोन करणाऱ्या अशा लोकांना मी घाबरत नाही. धमक्यांशिवाय ते दुसरे काही करू शकत नाहीत,’ असे इलियासी यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले.राजधानीतील कस्तुरबा गांधी मार्गावर मुख्यालय असलेल्या ‘ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन’चे अहमद इलियासी हे अध्यक्ष आहेत. भारतीय विद्या भवन विद्यालय व नवीन महाराष्ट्र सदन यांच्या मधल्या टप्प्यातील एका गोल चक्करवरच या संघटनेने कार्यालय थाटले आहे. इलियासी हे अटलबिहारी वाजपेयी सरकारच्याही जवळचे होते, असे सांगितले जाते. ‘अयोध्येतील कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यापासून मला धमक्यांचे फोन येत आहेत. मी काही कॉल रेकॉर्ड केले आहेत. माझ्याविरुद्ध २८ जानेवारीला हा फतवा जारी करण्यात आला. मी त्यांना एवढेच सांगतो की इतका द्वेष मनात असलेल्यांनी पाकिस्तानात जावे,’ असे त्यांनी सांगितले.‘मुख्य इमाम म्हणून रामजन्मभूमी तीर्थ न्यासाकडून निमंत्रण आले होते. मी दोन दिवस त्यावर विचार केला आणि एकोपा व देशहितासाठी अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र तेव्हापासून मला सतत धमक्या दिल्या जात आहेत. अयोध्येला गेल्याबद्दल मी अजिबात माफी मागणार नाही आणि संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामाही देणार नाही. धमक्या देणारे त्यांना हवे ते करू शकतात,’ असेही त्यांनी नमूद केले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *