म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : भायखळ्यातील जिजामाता उद्यान व प्राणी संग्रहालयात (राणीची बाग) गेल्या तीन वर्षांपासून सिंहाच्या जोडीसोबत लांडगे आणि पाणमांजर प्राणी आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. सिंहाची जोडी मिळवण्यासाठी देशभरातील तीन प्राणीसंग्रहालयांना पेंग्विनच्या दोन जोड्या देण्याबाबतची चर्चाही झाली. त्याला दोन महिने उलटून गेल्यानंतर प्रतिसाद मिळालेला नाही. तर सिंह मिळण्याच्याआधीच मुंबई महापालिकेने विविध सुविधा निर्माण करण्यासाठी केलेला कोट्यवधी रूपयांचा खर्च वाया जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

राणीच्या बागेत वृक्षराजींप्रमाणेच विविध वन्यप्राणी, पक्षी पाहण्यासाठी मुंबई, राज्यासह देशभरातील पर्यटक भेट देतात. पर्यटकांना आणखी काही प्राणी पाहायला मिळावेत, यासाठी मागील तीन वर्षांपासून सिंहाची जोडी आणण्याचा प्रयत्न होत आहेत. या बागेत सिंह येण्यापूर्वी पिंजरे, पर्यटकांसाठी प्रेक्षक गॅलरी आदी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. या सुविधांसाठी ८ कोटी २५ लाख रुपये खर्च केले. हा खर्च सिंह न मिळाल्याने वाया गेला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सिंह मिळावेत, यासाठी देशभरातील प्राणीसंग्रहालयाकडे प्रस्ताव मांडला जात आहे. जुनागढमधील सक्करबाग प्राणीसंग्रहालय, हैद्राबादमधील प्राणीसंग्रहालय आणि गुजरातमधील केवडिया प्राणीसंग्रहालयाशी सिंह मिळावेत यासाठी चर्चा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सिंहांच्या बदल्यात पेंग्विनच्या दोन जोड्या देण्याची तयारीही महापालिकेने दर्शवली. याबाबत प्राणीसंग्रहालयांशी चर्चा होऊनही यश मिळाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राणीच्या बागेत २०१६मध्ये पेंग्विन दाखल झाले. हे पेंग्विन पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहेत. सध्या येथील पेंग्विनची संख्या १८ असून त्यांच्या देखभालीसाठीही पालिका कोट्यवधी रूपये खर्च करत आहे. ऑक्टोबर २०२३मध्ये एका माहिती अधिकारात, पेंग्विनवर २९ कोटी रूपयांहून अधिक खर्च केल्याची माहिती उघड झाली होती. पेंग्विनचा देखभालीसाठी होणारा कोट्यवधींचा खर्च आणि त्यांचा सांभाळ करण्यासाठी होणारी कसरत पाहता अन्य प्राणीसंग्रहालयांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात भायखळ्यातील जिजामाता उद्यान व प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांना विचारले असता, सिंह आणण्यासाठी तीन प्राणीसंग्रहालयांशी संपर्क अद्याप सुरूच असून प्रतिसाद मिळालेला नाही. दोन जोडी पेंग्विन देऊन दोन जोडी सिंह दाखल करण्याचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

लांडगा, झेब्रा, पाणमांजराचीही प्रतीक्षा..

पर्यटकांना लांडगा पाहता यावा, यासाठी गेल्या एक वर्षापासून लांडग्याची जोडीही दाखल केली जाणार होती. त्यासाठी देशभरातील दहा प्राणीसंग्रहालयांकडे चर्चा सुरू केली. याशिवाय पाणमांजर दाखल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. संग्रहालयात अद्यापही हे प्राणी आलेच नाहीत. झेब्र्याच्या बदल्यात गुजरातच्या जुनागड येथून सिंह मिळणार होते. झेब्रा मिळवण्यासाठी परदेशातील प्राणीसंग्रहालयाशीही चर्चा करण्यात आली. त्याला अद्याप यश मिळाले नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *