मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. फेसबुक लाइव्ह करत असताना अचानक त्यांच्यावर गोळीबार झाला ज्यातून त्यांचा मृत्यू झाला. मॉरिस नरोन्हा याने घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या त्यानंतर त्याने स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. राजकीय वैमनस्यातून जरी हा खून झाल्याचं सांगितलं जात असलं तरी या घटनेमागील खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

दोन दिवसांपूर्वी मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली. त्यानंतर शुक्रवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसागर त्यांच्या अंत्ययात्रेत जमला होता. या घटनेनंतर दहिसर परिसरात तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे पोलिसांनी जिथे ही घटना घडली त्या बोरिवलीच्या आय. सी. कॉलनी परिसरात तसेच, घोसाळकरांच्या कर्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मॉरिसला कुठे दफन केलं?

घोसाळकरांची हत्या केल्यानंतर मॉरिसने स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली. मात्र, दहिसरमध्ये चर्चच्या आवारात त्याचा मृतदेह दफन करण्यावरुन स्थानिकांनी विरोध दर्शवला. इतकंच नाही तर लेडी ऑफ द इमॅक्युलेट कँसेप्शन चर्चचे फादर यांनीही मॉरिसचा मृतदेह चर्च परिसरात दफन करण्यास विरोध केला. त्यामुळे अखेर महालक्ष्मी येथे चर्च परिसरात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. येथे त्याला दफन करण्यात आले.

घोसाळकरांवर अंगरक्षकाच्या बंदुकीने गोळीबार

मॉरिसने घोसाळकरांवर गोळीबार करण्यासाठी आणि आत्महत्येसाठी उत्तर प्रदेशचा परवाना असलेले अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याचे रिव्हॉल्वर वापरले होते. याप्रकरणी पोलिसांनी अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा यांना अटक केली आहे. अमरेंद्र मिश्रा याच्याकडील शस्त्रपरवाना हा उत्तर प्रदेशातील फुलपूर येथील आहे. नियमाप्रमाणे परवाना मिळालेल्या शहरातून किंवा राज्यातून इतर ठिकाणी शस्त्र न्यायचं असल्यासं स्थानिक पोलिसांच्या परवानगीची आवश्यकता असते.

अभिषेक आमचा मुलगा होता, त्याच्यासोबत ज्यांनी हे केलं त्यांचं कधीच चांगलं होणार नाही : समर्थक

दिलेल्या कारणांची पडताळणी केल्यानंतर पोलिस काही दिवसांसाठी शस्त्र राज्याबाहेर नेण्याची परवानगी देऊ शकतात. अन्यथा शस्त्र बाळगण्याचा राष्ट्रीय परवाना घ्यावा लागतो. पण, या दोघांपैकी कुठल्याही अटी-शर्तींची पूर्तता न करता मिश्रा यांनी शस्त्र राज्याबाहेर नेल्याचं आढळून आलं. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली असून तपास सुरु आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *