नवी दिल्ली: केंद्र सरकारने २०२४च्या सुरुवातीला कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, माजी पंतप्रधान नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि वैज्ञानिक एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली. आतापर्यंत सरकारने ५ जणांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला आहे.

केंद्राने जाहीर केलेल्या या पुरस्कारावर कौतुक होत असताना काही लोकांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की, एकाच वर्षी पाच जणांना भारत रत्न कसा काय दिला. याबरोबरच अनेकांच्या मनात हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे की एक वर्षात किती जणांना भारतरत्न देता येतो. जाणून घेऊयात याचे उत्तर…

केंद्रीय गृहमंत्रालयानुसार एका वर्षात जास्तीजास्त ३ जणांना भारतरत्न दिला जाऊ शकतो. पण यावर्षी ५ जणांना हा पुरस्कार जाहीर झालाय. आता सरकारने याबाबत नियमात काही बदल केले आहेत का? किंवा ज्या ५ जणांना या वर्षी पुरस्कार जाहीर झाले आहेत त्यांना याआधीच्या वर्षासाठी हे पुरस्कार दिले आहेत का याबाबत कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

२०२४च्या आधी २०१९ साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आले होते. २०१९ साली सामाजिक कार्यकर्ता नानाजी देशमुख, गायक भूपेन हजारिका, भारताचे १३वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारत रत्न जाहीर झाला होता. त्यानंतर २०२०, २०२१, २०२२ आणि २०२३ मध्ये हा पुरस्कार जाहीर झाला नव्हता.

भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. हा पुरस्कार अशा लोकांना दिला जातो ज्याच्या कार्यामुळे देशाचा विकास झाला असेल. १९५४ साली हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. पहिला भारतरत्न पुरस्कार देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि चक्रवर्ती राजगोपालचारी यांना देण्यात आला होता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *